CM Mamata Banerjee : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचारप्रकरामळे पश्चिम बंगालमध्ये सध्या तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावरुन आता पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण तापलं आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एफआयआर त्यांचे भविष्य खराब करू शकते, असं विधान केलं होतं. या वक्तव्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला. त्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात नसल्याचे म्हणत स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या आदल्या दिवशी दिलेल्या भाषणावरून विद्यार्थ्यांविरोधात चुकीची प्रचार मोहीम सुरू करण्यात आली असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे. कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येविरोधात आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या विरोधात मी एक शब्दही उच्चारला नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
"मला काही प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये अपप्रवृत्तीची मोहीम आढळली आहे. जी काल आमच्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात मी दिलेल्या भाषणाच्या संदर्भात पसरवली गेली आहे. मी स्पष्ट करतो की मी (वैद्यकीय इ.) विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या आंदोलनाविरुद्ध एक चुकीचा शब्दही उच्चारलेला नाही. त्यांच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांची चळवळ योग्य आणि खरी आहे. मी त्यांना कधीही धमकावले नाही, कारण काही लोक माझ्यावर आरोप करत आहेत. पण हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे," असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
"मी भाजपच्या विरोधात बोलले. केंद्र सरकारच्या मदतीने ते आमच्या राज्यातील लोकशाही धोक्यात आणत असल्याने मी त्यांच्या विरोधात बोलले आहे. ते राज्यात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्या विरोधात मी आवाज उठवला आहे. मला हे देखील स्पष्ट करायचे आहे की, मी काल माझ्या भाषणात वापरलेला वाक्प्रचार ("फोन्स करा") श्री रामकृष्ण परमहंस देव यांची एक ओळ आहे. त्यांनी म्हटलं होतं की, कधी कधी आवाज उठवावा लागतो. गुन्हे, गुन्हेगारी घटना घडतात तेव्हा निषेधाचा आवाज बुलंद करावा लागतो. मी हे त्याच संदर्भात बोललो होते," असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.