नवी दिल्ली - राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (National Medical Commission) रुग्णांकडून मनमानी पद्धतीने पैसे घेणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची तयारी केली आहे. एनएमसीने नुकत्याच जाहीर झालेल्या आचारसंहितेत आता डॉक्टरांना महागडी ब्रँडेड औषधे रुग्णांना विकता येणार नाहीत, असं म्हटलं आहे. तसेच डॉक्टर वैद्यकीय उपकरणं देखील विकू शकत नाहीत. डॉक्टर त्यांच्या रुग्णाला तेच औषध विकू शकतात, ज्या आजारावर ते स्वतः उपचार करत आहेत. रुग्णांचं शोषण होणार नाही याचीही काळजी डॉक्टरांना घ्यावी लागणार आहे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने डॉक्टरांसाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. एनएमसीच्या या तरतुदीनंतर छोट्या शहरातील रुग्णांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. कारण, छोट्या शहरांमध्ये दवाखाने चालवणारे डॉक्टर स्वत:ची दुकाने उघडून रुग्णांना औषधे विकत असल्याचं दिसून आलं आहे. लहान शहरे आणि खेड्यातील गरीब लोकांना उपचाराच्या नावाखाली जास्त पैसे खर्च करावे लागतात. पण, आता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने केलेल्या नव्या बदलांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
एनएमसीच्या गाईडलाईन्सनुसार डॉक्टरांना औषध दुकान चालवता येत नाही किंवा वैद्यकीय उपकरणं विकता येत नाहीत. ते फक्त तीच औषधे विकू शकतो, ज्या आजारावर ते स्वत: उपचार करत आहेत. यासोबतच आता डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शनवरील नोंदणी क्रमांक तसेच शुल्क अगोदर सांगण्याच्या सूचना एनएमसीने दिल्या आहेत. धर्माच्या आधारावर कोणत्याही रुग्णाला उपचार नाकारता येणार नाहीत, असंही एनएमसीनं म्हटलं आहे. आता नसबंदीच्या बाबतीत पती-पत्नी दोघांची परवानगी घेणे बंधनकारक असणार आहे.
पहिल्या वर्षापासून अंतिम वर्षापर्यंतच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना ते डॉक्टर नसून विद्यार्थी असल्याचे सांगावे लागेल. देशामध्ये स्वातंत्र्यापूर्वीही असे अनेक कायदे आहेत, ज्यामध्ये डॉक्टरांना रुग्णांना औषधे देण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्यावेळी देशात औषधांची दुकाने कमी असायची आणि डॉक्टरांनीही सेवाभाव जपला. जागतिक आरोग्य संघटना देखील यासाठी परवानगी देते. छोट्या शहरांमध्ये ही तरतूद करण्यात आली कारण डॉक्टर घरी जाऊन रुग्णावर उपचार करतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.