Doda encounter : आता जम्मू-काश्मीरमध्येदहशतवादाविरोधात अंतिम हल्ल्याची तयारी सुरू आहे. लष्कराबरोबरच सरकारही कारवाईत आहे. लष्करानं दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम उघडली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचे बस्तान उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, जम्मू काश्मीरमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या दोडा येथील पटनीटॉप जंगलात दहशतवाद्यांशी लढताना भारतीय सैन्याच्या कॅप्टनला वीरमरण प्राप्त झाले आहे. डोडा येथील उंच भागात बुधवारी सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. याबाबत माहिती देताना संरक्षण अधिकारी म्हणाले की, भारतीय लष्कराच्या ४८ राष्ट्रीय रायफल्सचे कॅप्टन दीपक हे शहीद झाले. तर जवानांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.
जवान आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत गोळी लागल्यानंतर कॅप्टन दीपक यांना त्यांच्या पथकाने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. पटनी टॉपमधील जंगलातील अकर क्षेत्रातील एका नदीकिनारी लपलेल्या दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केला. बुधवारी सकाळी एन्काऊंटर करण्यात येत असलेल्या जागेवर आपली शस्त्र टाकून दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला. घटनास्थळावरुन अमेरिका एम ४ रायफलही जप्त करण्यात आली असून तीन बॅगेतून स्फोटकेही जप्त करण्यात आली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे. अनंतनाग, किश्तवाड आणि पटनी टॉपमध्ये दहशत माजवणाऱ्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. १५ ऑगस्टपूर्वीच लष्कराने दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांना कायमस्वरूपी स्वातंत्र्य देण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे.
एकीकडे लष्कराने दहशतवाद्यांविरोधात मोर्चा उघडला आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारनेही दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाईची तयारी केली आहे. संरक्षण मंत्रालयाने दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (NSA अजित डोवाल) यांच्यासह लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, संरक्षण सचिव आणि DGMO ही उपस्थित होते. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद संपवण्याची उलटी गिनती सुरू झाली आहे, हे स्पष्ट झाले आहे.