Owaisi On BSF । नवी दिल्ली : सीमी सुरक्षा बल अर्थात BSF बाबत खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी केलेल्या विधानामुळे वाद चिघळला आहे. आज हिंदू संघटना दिल्लीत ओवेसींच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. भाजपने ओवेसींच्या वक्तव्याला घातक राजकारण म्हटले आहे, तर काँग्रेस नेते उदित राज यांनी ओवेसींच्या सुरात सूर मिसळला आहे. बांगलादेशी घुसखोरांमुळे लोकसंख्या वाढत आहे तर मग बीएसएफ बिर्याणी खाऊन झोपत आहे का असे ओवेसी यांनी म्हटले होते. यावर काँग्रेस नेते उदित राज यांनी ओवेसी यांचे समर्थन केले. कुठेतरी केंद्राच्या दबावाखाली बीएसएफ कुमकुवत होत असून केंद्र सरकार घुसखोरांना हाकलून का लावत नाही असे उदित राज यांनी म्हटले.
ओवेसींनी काय म्हटले होते? एका कार्यक्रमादरम्यान ओवेसी म्हणाले होते की, "आरएसएस सतत सांगते की लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. कशी वाढत आहे? बांगलादेश मधून येणाऱ्यांमुळे वाढत आहे तर मग तुमची बीएसएफ झोपली आहे का? बिर्याणी खाऊन झोपते का? देशाच्या सीमेवर बीएसएफ आहे ना? बांगलादेशातून येणाऱ्यांचे धर्म बदलून देत आहेत? धर्मांतर कुठे होत आहे? तुम्हाला एवढी भीती कशाची आहे? बांगलादेशची अर्थव्यवस्था भारताच्या तुलनेत चांगली आहे. तिथला जीडीपी चांगला आहे. बांगलादेशात भारतापेक्षा जास्त रोजगार आहे, मग तिथून कोणी इथे का येईल?", असा प्रश्न देखील ओवेसींनी विचारला होता.
हिंदू संघटना उतरणार रस्त्यावरओवेसींच्या वक्तव्यावर भाजपने जोरदार टीका केली असताना हिंदू संघटनाही ओवेसींच्या वक्तव्यावर नाराज आहेत. आज दिल्लीत अनेक हिंदू संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. भाजप नेते आणि दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता म्हणाले, "जे धर्माचे राजकारण करून मतांचा फायदा घेतात. ते देशाच्या भल्याचा विचार करू शकत नाहीत. या प्रकारचे राजकारण घातक असून यातून ओवेसींची विचारसरणी दिसून येते. बीएसएफला दोष देणे चुकीचे आहे." याशिवाय देव ओवेसींचे भले करो असे केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी म्हटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"