नवी दिल्ली: गेल्या चार वर्षांमध्ये देशभरात झालेल्या बहुतांश निवडणुकांमध्ये भाजपाने विजयी पताका फडकावल्याचा दावा पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केला जातो. मात्र, या सगळ्या आकडेवारीवर बारकाईने नजर टाकल्यास एक वेगळेच सत्य समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपाच्या पाठिशी लोकाश्रय असल्याचा दावा केला होता. केंद्रातच नव्हे, तर तब्बल २० राज्यांत आमचे सरकार आहे. त्यामुळे आम्हाला लोकांचा पूर्ण पाठिंबा लाभला आहे, हे सिद्धच होते, असे मोदींनी म्हटले होते. परंतु आकडेवारीवर नजर टाकल्यास देशातील 4139 विधानसभेच्या जागांपैकी फक्त 1516 जागांवर (37 टक्के) भाजपाची सत्ता आहे. यापैकी 950 जागा या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये आहेत. त्यामुळे भाजपाने गेल्या चार वर्षांमध्ये अनेक राज्यांमध्ये सत्ता मिळवली हे खरे असले तरी त्यांच्याकडे बहुमत नाही. मे 2015 पासून झालेल्या 18 निवडणुकांमध्ये फक्त पाच राज्यांमध्येच भाजपाला स्वबळावर सत्ता स्थापन करता आली आहे. उर्वरित सहा राज्यांमध्ये भाजपाने मित्रपक्षांची मोट बांधून सत्ता हस्तगत केली आहे. तर अन्य सात राज्यांमध्ये विरोधी पक्षांनी सरकार स्थापन केले आहे. सध्याच्या घडीला 29 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशात भाजपाचे सरकार आहे. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये 2013 पासूनच भाजपाची सत्ता आहे. यामध्येही फक्त 10 राज्यांमध्येच भाजपाकडे बहुमत आहे. तर सिक्कीम, मिझोराम आणि तामिळनाडूमध्ये मित्रपक्षांच्या पाठिंब्याशिवाय भाजपाची कामगिरी शून्य असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. आंध्र प्रदेश विधानसभेत भाजपाचे केवळ 9 आमदार आहेत. केरळ विधानसभेच्या एकूण 140 जागांपैकी फक्त एकच जागा भाजपाकडे आहे. पंजाबमध्ये 117 पैकी 3, पश्चिम बंगालमध्ये 294 पैकी 9, तेलंगणात 119 पैकी 5 आणि दिल्लीत 70 पैकी केवळ 3 जागांवरच भाजपाचे आमदार आहेत. तर ओदिशा आणि नागालँड विधानसभेत भाजपाकडे अनुक्रमे 10 आणि 12 जागा आहेत.
हे सत्य माहिती आहे का? चार वर्षांत 18 राज्यांमध्ये निवडणुका, भाजपाला पाच राज्यांमध्येच बहुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 9:15 PM