नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील आई आणि वडिलांच्या उल्लेखावरुन मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारूक अब्दुल्ला यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी नेहमी आपल्या भाषणात स्वत:च्या आई-वडिलांचा उल्लेख करतात. मेरी माँ को गाली दिया, मेरे बाप को गाली दिया ?. पण पंतप्रधानांना हे शोभतं का, असा सवाल फारूक अब्दुल्ला यांनी उपस्थित केला आहे.
देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभांचा जोरदार धडाका राजकीय नेतेमंडळींकडून सुरू आहे. यादरम्यान, सत्ताधारी आणि विरोधक विकासकामांच्या मुद्यांऐवजी एकमेकांवर वैयक्तिक स्वरुपातील टीका करुन प्रचाराची पातळी घसरल्याचं पाहायला मिळाल. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नेते राज बब्बर आणि सी.पी. जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आईवरुन टीप्पणी केली होती. ''रुपया इतका घसरलाय की तो तुमच्या पूज्य आईच्या वयाच्या जवळ पोहोचलाय'', असं विधान राज बब्बर यांनी केले होते. हे प्रकरण ताजं असतानाच शनिवारी विलास मुत्तेमवार यांनी मोदींच्या वडिलांसंदर्भात वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर, मोदींनी या विधानांचा समाचार घेताना माझा बाप कशाला काढता, असा प्रश्न उपस्थित केला होता.
फारूक अब्दुला यांनी मोदींच्या या भाषणावरुन त्यांना लक्ष्य केलं. पीएम म्हणतात की माझ्या आईला शिवी दिली, माझ्या वडिलांना शिवी दिली. पण, पंतप्रधानांना हे शोभा देतं का ? मी कधीही माझ्या भाषणात आई-वडिलांचा उल्लेख करत नाही. देशाच्या पंतप्रधानांनी नेहमी उच्च विचार करायला हवा, असे फारूक यांनी म्हटलं. तसेच अटलबिहारी वाजपेयींनी पहिलं भाषण केलं होतं, त्यावेळी नेहरु त्यांच्याजवळ गेले अन् त्यांना म्हणाले, अटल तुम्ही एकेदिवशी या देशाचे पंतप्रधान बनणार. नेहरुजींना माहित होते की, हा देश एका व्यक्तीने पूर्णत्वास जाणार नाही.