नवी दिल्ली : सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे रणसंग्राम सुरु झाले आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत त्यांच्या भाषणात आपण चहा विकल्याचा उल्लेख करत आले आहेत.
एक चहावाला देशाचा पंतप्रधान शकतो. त्यामुळे काहीही शक्य आहे. मी देशाचा प्रधानसेवक म्हणून काम करणार असल्याचे नरेंद्र मोदी त्यावेळी यांनी सांगितले होते. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या चहा विकण्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर अनेकदा टीकाही केली आहे. मात्र, खरंच नरेंद्र मोदी चहा विकायचे की नाही, याबाबत त्यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी उत्तर दिले आहे.
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सोमाभाई मोदी यांनी सांगितले की, वडनगर रेल्वे स्टेशनवर वडिलोपार्जित आमचे दोन कँटीन होते. एक स्टेशनवर आणि दुसरे स्टेशनच्या बाहेर होते. याठिकाणी नरेंद्र मोदी यांच्यासह आम्ही सुट्टीच्या दिवशी आणि रविवारी येत होतो आणि चहा विकण्याचे काम करत होतो.
आमच्या वडिलांना मदत म्हणून आम्ही चहा विकण्याचे काम करत होतो. त्यावेळी कँटीनमध्ये नोकर ठेवू शकत नव्हतो. त्यामुळे आम्ही भावंडं कँटीनमध्ये जाऊन चहा विकण्याचे काम करत होतो, असे सोमाभाई मोदी यांनी म्हटले आहे. याचबरोबर, नरेंद्र मोदी यांना चहा विकण्यावरुन विरोधकांना जे काय म्हणायचे आहे ते म्हणू देत. मात्र त्यांनी स्टेशनवर चहा विकला होता. हे वास्तव आहे, असेही सोमाभाई मोदी यांनी सांगितले.
याशिवाय, नरेंद्र मोदी यंदाच्या निवडणुकीत चौकादार असल्याचे सांगत आहेत. यावरुनही विरोधकांनी त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. याविषयी बोलताना सोमाभाई म्हणाले,'नरेंद्र मोदी हे स्वतःला चौकीदार आजच म्हणत नाहीत. तर ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी चौकीदार असल्याचा नारा दिला होता. ते म्हणायचे की मी गुजरातचा चौकीदार आहे.'