लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावा, अशी एका व्यक्तीने केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एस. के. कौल, न्या. अभय ओक यांनी फेटाळून लावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याचिकादाराला धारेवर धरताना म्हटले आहे की, गायीला राष्ट्रीय पशू म्हणून घोषित न केल्याने कोणत्या मूलभूत हक्कांवर गदा येणार आहे हे याचिकादाराने स्पष्ट केले पाहिजे. अशा प्रकारच्या याचिकांवर सुनावणी घेणे हे न्यायालयाचे काम आहे का? मुळात अशा प्रकारच्या याचिका का केल्या जातात, असा सवालही खंडपीठाने उपस्थित केला.
त्यावर याचिकादाराच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, गायींचे संरक्षण करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. ही याचिका मागे घेतली नाही, तर आम्ही याचिकादाराला दंड ठोठावू, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. ही याचिका गोवंश सेवा सदन ही स्वयंसेवी संस्था व इतर काही व्यक्तींनी न्यायालयात दाखल केली होती. (वृत्तसंस्था)