पंतप्रधानांकडे डोकलाम प्रश्नावर तोडगा आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 03:29 AM2018-03-28T03:29:19+5:302018-03-28T03:29:19+5:30
डोकलाममध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना कसा करावा, याचा तोडगा ‘५६ इंचाची छाती असलेल्यांकडे असावा, अशी आशा आहे
नवी दिल्ली : डोकलाममध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना कसा करावा, याचा तोडगा ‘५६ इंचाची छाती असलेल्यांकडे असावा, अशी आशा आहे,’ असा टोला काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. डोकलाम हा आमचाच प्रदेश असून, गेल्या वर्षी येथे जे घडले, त्यापासून भारताने धडा शिकायला हवा, असे चीनने सोमवारी म्हटले होते.
या अनुषंगाने केलेल्या टिष्ट्वटमध्ये राहुल गांधी यांनी उपरोधिकपणे म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात केलेल्या टिष्ट्वटर पोलमध्ये हजारो लोक सहभागी झाले. डोकलामचा प्रश्न सोडविण्यासाठी नरेंद्र मोदी आलिंगन नीतीचा उपयोग करतील, संरक्षणमंत्र्यांना दोष देतील व जाहीरपणे अश्रू ढाळतील, असे या पोलमध्ये सहभागी झालेल्यांपैकी ६३ टक्के लोकांना वाटते. मात्र, ५६ इंचाची छाती असलेल्यांकडे डोकलाममधील स्थितीवर मात करण्यासाठी ठोस तोडगा असावा, अशी आशा आहे.
सिक्कीमच्या सीमेला लागून असलेल्या डोकलाममध्ये चीनच्या लष्कराने रस्ता बांधायला घेतला होता. त्याला भारतीय लष्कराने आक्षेप घेतला. चीनी लष्कराने डोकलाममध्ये एक प्रकारे घुसखोरीच चालविली होती. ती रोखण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज झाले. त्यामुळे भारत व चीनचे लष्कर संघर्षाच्या पवित्र्यात डोकलाममध्ये उभे ठाकले. ही स्थिती सुमारे ७३ दिवस कायम होती. भारताने आपले सैन्य मागे नेण्यास ठाम नकार दिला होता. सरतेशेवटी चर्चा होऊन दोन्ही देशांनी आपले सैन्य माघारी नेले. मात्र, तरीही डोकलाममधील तणाव पूर्णपणे संपलेला नाही. आता चीनने पुन्हा या भागात बांधकाम सुरू केल्याच्या बातम्या झळकल्या होत्या.