राफेलच्या प्रश्नांवर मोदींचं तोंड बंद का ?- राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 12:05 AM2017-11-28T00:05:01+5:302017-11-28T00:13:30+5:30
अहमदाबाद- गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय उलथापालथ सुरू आहेत. जनतेसमोर सभा घेऊन काँग्रेस व भाजपा एकमेकांवर कुरघोडी करत असतात.
अहमदाबाद- गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय उलथापालथ सुरू आहेत. जनतेसमोर सभा घेऊन काँग्रेस व भाजपा एकमेकांवर कुरघोडी करत असतात. त्याप्रमाणेच ट्विटरवरूनही भाजपा व काँग्रेसवाल्यांची एकमेकांवर चिखलफेक सुरू असते. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना शब्दांच्या आडून शालजोडीतले हाणत असतात.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राहुल गांधींनी मोदींना ट्विटरच्या माध्यमातून उपरोधिक टोला हाणला आहे. चेहरे पर शिकन, माथे पर पसीना, डरे-डरे से साहेब नज़र आते हैं, शाह-जादा, राफेल के सवालों पर जाने क्यूँ इनके होंठ सिल जाते हैं, असं ट्विट करत राहुल गांधींनी एकाच वेळी तिघांवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी या ट्विटमधून नरेंद्र मोदी, अमित शाह व त्यांचे पुत्र जय शाह यांनाही लक्ष्य केलं आहे.
चेहरे पर शिकन, माथे पर पसीना
— Office of RG (@OfficeOfRG) November 27, 2017
डरे-डरे से साहेब नज़र आते हैं
शाह-जादा, राफेल के सवालों पर
जाने क्यूँ इनके होंठ सिल जाते हैं
गुजरात विधानसभा निवडणूक प्रचाराच्या या टप्प्यात काँग्रेसतर्फे राहुल गांधी यांनी बाजी मारली आहे. त्यांच्या सभांना मोठी गर्दी होत असून, भाजपाला त्याचीच चिंता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही भाजपासाठी निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यानंतर बड्या नेत्यांचे सामने राज्यात पाहायला मिळतायत. सध्या काँग्रेस आणि भाजपा एकमेकांना गुजरातविरोधी ठरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. राहुल गांधी यांचा दौरा महात्मा गांधी की जन्मस्थळ असलेल्या पोरबंदरहून सुरू झाला आहे. राहुल गांधींनी या दौ-यात मच्छीमारांचे प्रश्न, त्यांना मिळणा-या डिझेलवरील उठवण्यात आलेली सबसिडी, शेतक-यांच्या समस्या, बेरोजगारीचा प्रश्न आणि टाटांच्या नॅनो प्रकल्पाला देण्यात आलेले ३३ हजार कोटी यावरून भाजपावर हल्ला चढवला आहे. काळा पैसा नष्ट करण्याच्या नावाखाली देशातील गरिबांना बँकांच्या रांगेत उभे करणा-या मोदी सरकारने १0-१२ उद्योगपतींचे भले केल्याचा आरोप त्यांनी केला आणि गुजरातमध्ये उच्च शिक्षण व आरोग्य सेवा महाग करायला भाजपा सरकारच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली. हे सर्व मुद्दे उपस्थित करून भाजपा गुजरातविरोधी असल्याचे ते सर्व सभांतून मतदारांच्या मनात बिंबवत होते.