"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 04:31 PM2024-05-30T16:31:57+5:302024-05-30T16:32:47+5:30
Lok Sabha Election 2024: गांधीजींना संपूर्ण जग ओळखतं. यूएनपासून प्रत्येक ठिकाणी ते आहेत. गांधीजी हे जगातील लोकांची प्रेरणा ठरले आहेत. जर महात्मा गांधींबाबत मोदींना (Narendra Modi) माहिती नसेल तर त्यांना राज्यघटनेबाबतही माहिती नसेल,असं विधान मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला सांगितलं की, त्यांना गांधीजींबाबत चित्रपट पाहिल्यानंतर माहिती मिळाली. मोदींच्या या विधानाबाबत हसू येतं. गांधीजींना संपूर्ण जग ओळखतं. यूएनपासून प्रत्येक ठिकाणी ते आहेत. गांधीजी हे जगातील लोकांची प्रेरणा ठरले आहेत. जर महात्मा गांधींबाबत मोदींना माहिती नसेल तर त्यांना राज्यघटनेबाबतही माहिती नसेल,असं विधान मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं आहे.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ही निवडणूक कायम लक्षात ठेवली जाईल. जात-धर्म-वर्ग सोडून संपूर्ण देश हा राज्यघटना वाचवण्यासाठी पुढे आला. आम्ही विविध मुद्द्यांच्या आधारावर मतं मागितली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ दिवसांच्या भाषणामध्ये २३२ वेळा त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं. ५७३ वेळा इंडिया आघाडीचं नाव घेतलं. मात्र बेरोजगारीबाबत ते चकार शब्द बोलले नाहीत. यादरम्यान मोदींनी ४२१ वेळा मंदिर-मशीद आणि २२४ वेळा पाकिस्तानचं नाव घेतलं, असा टोला मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये महात्मा गांधी यांच्याबाबत बोलताना गांधीजींवर चित्रपट तयार झाल्यानंतर जगाला महात्मा गांधींबाबत समजलं, असा दावा केला होता. या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ते म्हणाने की, नरेंद्र मोदी गांधीजींना ओळखत नाहीत. त्यांना गोडसे कळतात. तसेच गोडसेंच्या मार्गावून मार्गाक्रमण करतात. महात्मा गांधी संपूर्ण जगासाठी प्रेरणा होते. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइन्स्टाइन ये सर्वजण गांधीजींपासून प्रेरित झाले होते, असं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं.