Dog Attack News : गेल्या काही महिन्यांपासून देशात कुत्र्यांची दहशत वाढतच चालली आहे. सातत्याने कुत्र्यांच्या हल्ल्याच्या बातम्या कोणत्या ना कोणत्या शहरातून येत असतात. ताजे प्रकरण तेलंगणातीलहैदराबादचे आहे. येथे रविवारी एका चार वर्षांच्या चिमुरड्यावर 3-4 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. कुत्र्यांचा हल्ला इतका भयानक होता की त्यांनी मुलाचे पोटही फाडले. हल्ल्यानंतर लगेचच मुलाला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याचा मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
निजामाबादचे रहिवासी असलेले गंगाधर हैदराबादमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. त्याचे कुटुंबही त्याच इमारतीत राहते. गंगाधर हे सुरक्षा रक्षक असलेल्या इमारतीतच कुत्र्यांनी त्यांच्या मुलावर हल्ला केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, मूल रस्त्यावर फिरत आहे आणि तेवढ्यात तीन-चार कुत्रे येऊन त्याच्यावर हल्ला करतात.
कुत्र्यांनी हल्ला केल्याने बालक जमिनीवर कोसळल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. यानंतर कुत्रे त्याला दातांनी ओरबाडून काढतात. रक्ताने माखलेले मूल जिवाच्या अकांताने आरडा-ओरड करते. मुलाचे रडणे ऐकून वडील गंगाधर त्याच्याकडे धावतात आणि कुत्र्यांना हकालून देतात. यानंतर त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.