भटक्या कुत्र्यांमुळे दहशत; हातात एअर गन घेऊन मुलांना शाळेत सोडायला निघाला बाप, Video व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 07:15 PM2022-09-16T19:15:20+5:302022-09-16T19:16:56+5:30
केरळमधील एक व्हिडिओ समोर आलाय, ज्यात एक व्यक्ती हातात एअर गन घेऊन मुलांना शाळेत सोडताना दिसतोय.
Dog Attackes Kerala: सध्या देशाच्या विविध भागातून पाळीव कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना समोर येत आहेत. याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होताहेत. फक्त पाळीव कुत्रेच नाही तर भटके कुत्रेही लोकांवर हल्ले करत आहेत. केरळमध्येही या भटक्या कुत्र्यांची मोठी समस्या आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एका व्यक्तीने अजब शक्कल लढवली.
केरळमधील कासारगोडमध्ये कुत्र्यांपासून आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी, एक व्यक्ती एअर गन घेऊन फिरतोय. हातात एअर गन घेऊन, हा माणूस रोज आपल्या मुलांना शाळेत सोडतो. समीर असे या व्यक्तीचे नाव असून, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राज्यभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्यामुळे, समीरचा हा व्हिडिओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
Watch | Man carrying airgun escorts school children to protect them from stray dogs in #Kerala#KeralaStrayDogMenacepic.twitter.com/F2QObkqX5P
— TOI Trivandrum (@TOI_Trivandrum) September 16, 2022
व्हिडीओमध्ये तो बंदुक घेऊन मुलांसमोर चालताना दिसत आहे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत समीरने सांगितले की, "मदरशातील एका मुलावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला होता, त्यामुळे सर्व मुले मदरशात जायला घाबरत होती. कुत्र्यांच्या भीतीने शेजाऱ्यांनीही मुलांना शाळेत पाठवणे बंद केले होते. मुलांची सुरक्षा करणे, ही वडील म्हणून माझी जबाबदारी आहे. त्यामुळेच मी एअर गन घेऊन रोज मुलांना शाळेत घेऊन जात आहे."