नवी दिल्ली/ चेन्नई : अखिल भारतीय अण्णा द्रमुकचे (अम्मा) नेते टीटीव्ही दिनकरन यांना पक्षाचे दोन पाने हे निवडणूक चिन्ह आयोगाकडून काहीही करून मिळवायचे व आर.के. नगर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकायची होती. ही निवडणूक जिंकली असती, तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला असता, असा त्यांचा विचार होता, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले. सत्ता प्राप्त करायची हीच योग्य वेळ असल्याचे दिनकरन यांची खात्री होती. दिनकरन यांची व्यापक चौकशी केली गेली व त्यांना एकच प्रश्न पाच वेगवेगळ्या रीतीने विचारला गेला. आधी त्यांनी परस्परविरोधी उत्तरे दिली व नंतर त्यांना रडू कोसळले. दिनकरन आणि मल्लिकार्जुन यांच्यासमोर पुरावे आणल्यानंतर त्यांनी निवडणूक आयोगाने गोठवून ठेवलेले दोन पाने हे निवडणूक चिन्ह परत मिळवण्यासाठी कोणता कट रचला याची माहिती दिली. लाच देण्याच्या प्रयत्नांची दिल्ली पोलीस चौकशी करीत आहेत. पोलिसांनी दिनकरन यांच्या सोबत त्यांचा मित्र मल्लिकार्जुन यालाही विमानाने आणले. चौकशीचा भाग म्हणून पोलिसांनी दिनकरन व मल्लिकार्जुन यांच्या चेन्नईतील निवासस्थानांची झडती घेण्यासाठीचा न्यायालयाकडून आदेशही मिळवला आहे. दिनकरन यांना चार दिवस चौकशी केल्यावर मंगळवारी रात्री अटक झाली. अ.भा.अ.द्रमुकचे ‘दोन पाने’ हे निवडणूक आयोगाने गोठवलेले निवडणूक चिन्ह आपल्या गटाला (अम्मा) मिळण्यासाठी आयोगाच्या अज्ञात अधिकाऱ्याला ५० कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न चंद्रशेखर नावाच्या व्यक्तीमार्फत केल्याचा दिनकरन यांच्यावर आरोप आहे. चंद्रशेखर याला १६ एप्रिल रोजी दिल्लीत हॉटेलमध्ये अटक केली त्यावेळी त्याच्याकडे १.३० कोटी रुपये रोख होते. दिनकरन यांनी ही रक्कम अज्ञात मार्गांनी जमवली व चेन्नईहून दिल्लीला बेकायदा मार्गांनी आणल्याबद्दल त्यांना अटक झाली. दिनकरन यांना मदत केल्याबद्दल मल्लिकार्जुन याला अटक झाली.
काहीही करून दिनकरन यांना मुख्यमंत्री व्हायचे होते
By admin | Published: April 28, 2017 1:44 AM