दासना (उत्तर प्रदेश) : खळबळजनक ठरलेल्या आरुषी व हेमराज हत्याकांड खटल्यात निर्दोष ठरलेले आरुषीचे आई-वडील नुपूर व राजेश तलवार हे दासना तुरुंगात दर १५ दिवसांनी कैद्यांची दंत तपासणी करणार आहेत. हे पती-पत्नी नोव्हेंबर २०१३ पासून गाझियाबादेतील दासना तुरुंगात आहेत. या हत्याकांड खटल्यात त्या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती व नुकतीच त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सोमवारी त्या दोघांची दासना तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे.नुपूर व राजेश तलवार हे व्यवसायाने दंतवैद्य असून या तुरुंगातील जवळपास बंद पडलेला दंतविभाग त्यांनी सक्रिय केला, असे तुरुंगाच्या अधिकाºयांनी सांगितले. ‘तलवार यांच्या सुटकेनंतर या दंत विभागाचे काय होणार या चिंतेत आम्ही होतो, परंतु त्यांनी आम्हाला आम्ही दर १५ दिवसांनी कैद्यांची तपासणी करू, असे आश्वासन दिले, असे तुरुंगाचे डॉक्टर सुनील त्यांनी म्हणाले. कैद्यांबरोबरच तलवार दाम्पत्याने तुरुंगातील कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या मुलांवरही उपचार केल्याचे त्यागी म्हणाले. अलाहाबाद उच्च न्यायालयाने तलवार दाम्पत्याची सुटका केल्यापासून त्यांचा सल्ला घेण्यासाठी कैद्यांची गर्दी वाढली आहे.
तलवार करणार कैद्यांची दंत तपासणी, तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही देणार दर पंधरा दिवसांनी सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 1:40 AM