नवी दिल्ली, दि. 11 - भारत व चीन गेल्या दोन महिन्यांपासून डोकलाम विवादावरुन आमनेसामने उभे ठाकले आहेत. डोकलाम संघर्षावरुन सीमेवर तणाव निर्माण झाल्याने भारतीय सेनेनं परिसरातील गावं रिकामी करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली. मात्र गुरुवारी भारतीय सेनेनं असा काही प्रकार झाला नसल्याचे सांगत वृत्त फेटाळून लावले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)कडून तिबेटमध्ये सैनिक, तोफखान्यांशिवाय एअर डिफेन्स युनिटमध्ये वाढ करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे, मात्र प्रत्यक्षात नियंत्रण रेषेजवळ चीनकडून सैन्य-शस्त्रास्त्र तैनात होत नसल्याचे म्हटले जात आहे. शिवाय अशी कोणतीही घटना नजरेस पडलेली नाही, ज्यामुळे भारतीय सुरक्षा दलांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
भारतीय सैन्यातील सूत्रांनी असे सांगितले आहे की, ''सीमेवर पीएलएकडून कोणत्याही प्रकारे सैन्याची जमवाजमव होण्यास आठवड्याचा कालावधी लागतो. शिवाय, परिस्थितीची पार्श्वभूमीवर माहीत असल्यानं आपल्या सैनिकांकडे तोफखाने, रॉकेट आणि अन्य शस्त्रास्त्रदेखील आहेत. भारतीय सैनिक सध्या 'ना युद्ध, ना शांती' अशा परिस्थितीत आहे. मात्र, आवश्यकता भासल्यास योग्य ते प्रत्युत्तर देण्यासही भारत सक्षम आहे''.
भूतानच्या डोकलाम परिसरात चीनच्या सैन्यानं जून महिन्यात मार्ग बनवण्याचे काम सुरू केले. यानंतर भूतान-भारत-चीनमध्ये या मार्गावरुन तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा तणाव कमी करण्यासाठी परराष्ट्रसंबंधविषयकही मार्गांचाही वापर केला जात आहे. आणखी एका सूत्रांनी सांगितल्यानुसार, ''शुक्रवारी नाथू ला मध्ये दोन्ही देशांतील सीमा अधिका-यांमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे''.
यादरम्यान, ''तणावाच्या परिस्थितीत सिक्कीमजवळील सीमेवरील कुपुप, नथांग आणि जुलुकसहीत अन्य गावं रिकामी करण्यास येत असल्याच्या वृत्ताचे सैन्यानं खंडण केले आहे. सूत्रांनी सांगितले की, कोणतंही गाव रिकामं करण्यात आलेले नाही, तसा सैन्याचा उद्देशही नाही. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा भीती पसरवली जाऊ नये.'' मात्र तरिही भारतीय सैन्य लदाखसंदर्भात अरुणाचल प्रदेशातील जवळपास 4057 किलोमीटर लांब नियंत्रण रेषेवर पूर्णतः सावध पावलं टाकत आहे. ''जिथे चीन भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे तिथे भारतदेखीसल कोणत्याही परिस्थितीस सामोरं जाण्याची तयारी करत आहे'', असेही सूत्रांनी सांगितले.