युक्रेन आणि रशिया यांच्यात जबरदस्त युद्ध सुरू आहे. अशातच जगभरातील अनेक लोक युक्रेनला मदत करण्यासाठी निधी उभारत आहेत. प्रसिद्ध गुजराती गायिका गीता बेन रबारीने युक्रेनला मदत करण्यासाठी अमेरिकेत एक मैफिल केली. यादरम्यान त्यांच्यावर अक्षरशः डॉलर्सचा पाऊस पडला. या कार्यक्रमाला परदेशी भारतीय (एनआरआय) मोठ्या संख्येने उपस्थित होते. मैफिलीतून उभारलेला निधी युक्रेनला मदत म्हणून दिला जाणार आहे. या मैफिलीचे फोटोज आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
अमेरिकेमध्ये जॉर्जियातील अटलांटा शहरात शनिवारी या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलीत गीता बेन रबारी आणि त्यांचे साथीदार मायाभाई अहिर आणि सनी जाधव यांनी भारतीय आणि गुजराती संगीताने खास वातावरण केले होते. गीता बेनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मैफिलीचे फोटो शेअर केले आहेत.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, हा कार्यक्रम सुरत लेवा पटेल समाजाने आयोजित केला होता. आयोजकांनी या कार्यक्रमातून 3 लाख डॉलर अथवा सुमारे 2.25 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे, हा निधी युक्रेनला मदत म्हणून देण्यात येणार आहे.
गीता बेन रबारी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. आठवड्याभरापूर्वी तिनी टेक्सासमध्येही लाइव्ह मैफल केली होती. याशिवाय तिने रविवारी लुइसव्हिल शहरातही लाइव्ह परफॉर्मन्स दिला.