नवी दिल्ली: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्यानं गृहिणीचं बजेट आता कोलमडणार आहे. सलग पाचव्या महिन्यात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
गॅस कंपन्यांनी विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर (14.2 किलो)च्या दरात 19 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता घरगुती गॅस 749 रुपयांना मिळणार आहे. तसेच व्यावसायिक सिलिंडर (19किलो)च्या किंमतीत 29.50 वाढ करण्यात आल्याने आता सिलिंडर घेण्यासाठी 1325 रुपये मोजावे लागणार आहेत. सिंलिंडरचे नवीन दर आजपासून (बुधवार) लागू करण्यात येणार आहे.
1ऑक्टोबरला देखील देशातल्या मुख्य शहरातील विनाअनुदानित गॅस सिलिंडर 15 रुपयांनी महागला होता. नवी दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरसाठी 605 रुपये मोजावे लागत होते. कोलकात्यात याच सिलिंडरचा दर 630 रुपये द्यावे लागत होते. मुंबई, चेन्नईमध्ये 14.2 किलोच्या विनाअनुदानित सिलिंडरचे दर क्रमशः 574.50 आणि 620 रुपये झाले होते. तर 19 किलोग्राम सिलिंडरची दिल्लीतली किंमत 1085 रुपये झाली होती. कोलकात्यात 1139.50 रुपये, मुंबई 1032.50 रुपये आणि चेन्नईमध्ये याच 19 किलोच्या सिलिंडरचे दर 1199 रुपये होती.