नवी दिल्ली : देशांतर्गत विक्रीमुळे भारतीयअर्थव्यवस्था जागतिक मंदीपासून सुरक्षित राहिली आहे, कारण भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा मोठा हिस्सा देशांतर्गत मागणीवर अवलंबून आहे, असे प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी बुधवारी केले.
भारताच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या जी-२० देशांच्या बैठकीनिमित्त बंगा हे येथे आले आहेत. त्यानिमित्त त्यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांना सांगितले की, जी-२० परिषदेशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर आम्ही विचारविनिमय केला. याशिवाय जागतिक बँक व भारत यांच्यातील सहकार्याशी संबंधित मुद्द्यांवरही आम्ही चर्चा केली. बंगा यांनी सांगितले की, सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे वातावरण आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत मंदीशी संबंधित जोखीम कायम राहणार आहे. मात्र, भारताच्या जीडीपीचा मोठा हिस्सा देशांतर्गत विक्रीतून येत असल्यामुळे या संकटापासून भारत सुरक्षित राहील. देशांतर्गत मागणीने भारताला मंदीच्या संकटापासून दूर ठेवण्याचे काम केले आहे. गांधीनगरमध्ये जी-२० देशांचे वित्तमंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर यांची बैठक संपन्न झाली. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसारख्या बहुपक्षीय विकास संस्थांच्या भूमिकेबाबत बैठकीत चर्चा झाली.
कोविड काळातील आव्हानांचा केला मजबुतीने मुकाबलादिल्लीच्या दौऱ्यात बंगा यांनी एका कौशल्य विकास केंद्रास भेट देऊन विद्यार्थ्यांशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, कोविड साथीच्या काळात निर्माण झालेल्या आव्हानांचा भारताने मजबुतीने मुकाबला केला. त्यासाठी अनेक उपाय योजना केल्या. ही गती पुढेही कायम ठेवणे आवश्यक आहे.