अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १२ हजार किमी प्रवास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरातमधील अहमदाबाद शहरात येतील. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षाने ट्रम्प यांच्या स्वागताची भव्य तयारी केली आहे. त्यासाठी १०० कोटी रुपये खर्च केलेत असा आरोप लावला आहे. मात्र तज्ज्ञांनी याबाबत वेगळी मते व्यक्त केली आहेत. भारत आणि अमेरिका जागतिक प्लॅनवर काम करत आहे त्यासाठी १०० कोटी रुपये काहीच नाहीत असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.
परराष्ट्रीय संबंधाचे अभ्यासक कमर आगा यांनी सांगितले की, कोणत्याही परदेशी राष्ट्राध्यक्षाचे स्वागत केल्याने पैसे वाया जात नाहीत. डोनाल्ड ट्रम्प जगातील सर्वाधिक शक्तिशाली देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प कमीवेळा आशियाई देशाच्या दौऱ्यावर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध मजबूत करणारा आहे. अमेरिकेत ४० लाख एनआरआय राहतात, जवळपास २ लाखांहून अधिक विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेतात. २ हजार अमेरिकन कंपन्या भारतात काम करतात. भारताच्या २०० कंपन्या अमेरिकेत काम करतात. भारत आणि अमेरिकेत १४२ अरब डॉलर व्यापार होतो. याचा फायदाही भारताला होत आहे असं त्यांनी सांगितले.
अमेरिकेसोबत ट्रेड डिल न झाल्यावरही कमर आगा यांनी भाष्य केलं. भारत आणि अमेरिका यांच्यात काही मुद्द्यावर निश्चित मतभेद कायम राहतील. अमेरिकेसोबत ट्रेड डील झाली नसली तरी काही गोष्टींवर दोन्ही देशाचं सहमत आहे. दहशत रोखण्यासाठी भारत अमेरिका एकमेकांना मोठ्या प्रमाणात मदत करतील. ट्रम्प यांना भारत पाकिस्तानच्या नापाक करकुतीबद्दल सांगू शकतं. अमेरिका आणि तालिबान यांच्यात अफगाणिस्तानवरुन मोठा करार होणार आहे. भारत अफगाणिस्तानला घेऊन चिंतेत आहे. जर हा करार झाला तर पाकिस्तान समर्थक तालिबानी दहशतवादी काश्मीरकडे मोर्चा वळवतील अशी भीती भारताला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार भारताने शांती मिशनतंर्गत त्यांचे सैन्य अफगाणिस्तानला पाठवावं असा दबाव अमेरिका टाकत आहे. मात्र अमेरिकेच्या दबावाखाली भारताने येऊ नये, सोवियत संघ आणि अमेरिका अफगाणिस्तानमध्ये काही करु शकत नसल्याने भारताला पुढे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारताने अफगाणच्या सुरक्षा दलाला प्रशिक्षण देण्याचं काम करावं. अमेरिका अफगाणच्या सुरक्षा दलाला प्रशिक्षण देऊ शकत नाही. भारत हे काम पूर्ण करु शकतं असं कमर आगांनी सांगितले.
त्याचसोबत अफगाणिस्तान जागतिक नकाशावर महत्त्वपूर्ण जागेवर आहे. त्यामुळे अमेरिकेसाठी अफगाणिस्तान महत्त्वाचा आहे. तालिबानसोबत युद्ध नाही तर त्यांची मदत करु अशी अमेरिकेची इच्छा आहे. अमेरिकेच्या निशाण्यावर इराण आणि मध्य आशिया आहे. अमेरिका तालिबानच्या मदतीने इराणला नियंत्रण करु इच्छितं. अमेरिका मध्य आशियाई देश तुर्कमेनिस्तान, किर्गिस्तान, उज्बेकिस्तान, कजाखिस्तान अशा देशांमधून एक मोठी पाइपलाइन अफगाणिस्तानच्या मार्गे अरबी समुद्रापर्यंत नेण्याचं स्वप्न आहे. अमेरिकेच्या या प्रकल्पामुळे मध्य आशियाई देशांमधील चीन आणि रशियाचा प्रभाव संपुष्टात येऊ शकतो.