नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादला भेट देणार असून या पार्श्वभूमीवर याठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे. यावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने ट्विटवर लिहिले आहे की, इतका खर्च करूनही डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत लगेच ट्रेड डील करण्यास नकार दिला आहे.
बुधवारी काँग्रेसने यासंबंधी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये, "भारताकडून होणाऱ्या स्वागतावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खूश नाहीत. ते इतके नाराज झाले आहेत की, त्यांनी भारतासोबत होणारी ट्रेड डील रोखली आहे. असे वाटते, मोदी यांना ट्रम्प यांच्या गुड बुक्समध्ये येण्यासाठी PR एक्सरसाइजवर ध्यान द्यावे लागेल." याचबरोबर, काँग्रेसने यासोबत एक फोटो शेअर केला आहे. तसेच, डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी 100 कोटी रुपये खर्च झाले आहेत. 45 कुटुंबीयांना हटविण्यात आले आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत दौऱ्यापूर्वी मोठे विधान केले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही भारतासोबत मोठी ट्रेड डील करू इच्छित आहोत. मात्र ही डील अमेरिकेतील निवडणुकीपूर्वी होईल की, नंतर याविषयी काहीही सांगता येणार नाही. तसेच, यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला आवडतात, असे म्हटले. मात्र, भारताने आमच्यासोबत चांगला व्यवहार केला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याच्या तारखा व्हाईट हाऊसने जाहीर केल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दौऱ्यात भारत-अमेरिकेदरम्यान काही करार होण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांना अहमदाबादलाही भेट देणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात हॉस्टनमध्ये 'हाउडी मोदी' कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर आले होते. त्यावेळी भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी अबकी बार ट्रम्प सरकार अशी घोषणाही केली होती.