हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'राष्ट्रपिता' असे संबोधल्यामुळे एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी दूरपर्यंत फादर ऑफ इंडिया नाही आहेत. डोनाल्ड ट्रम्प एक अज्ञान व्यक्ती आहेत. त्यांना भारताबद्दल किंवा महात्मा गांधी यांच्याबद्दल काही माहीत नाही. तसेच, जगाबद्दल सुद्धा त्यांना काहीच माहीत नाही, असे असुदुद्दीन ओवेसी यांनी म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना फादर ऑफ द नेशन म्हटले. ट्रम्प जाहील आणि अज्ञान आहेत. गांधीजींची आणि मोदींची तुलना कधीच होऊ शकत नाही. जर हे ट्रम्प यांना माहीत असेत तर त्यांनी अशी जुमलेबाजी केली नसती, असे असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले. तसेच, महात्मा गांधी यांना लोकांनी त्यांचा त्याग पाहून राष्ट्रपिता हा किताब दिला होता. पंडित नेहरू आणि सरदार पटेल हे दोघेही देशातील थोर नेते होते. पण, त्यांनाही कधी कुणी 'राष्ट्रपिता' म्हणाले नव्हते, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
याचबरोबर, मोदींना कुणीतरी एल्विस प्रेस्ली म्हणाले होते. त्यात तथ्य असू शकते. कारण, एल्विस प्रेस्ली उत्तम गायचे आणि गर्दी जमवायचे. आमचे पंतप्रधान सुद्धा चांगले भाषण देऊन गर्दी गोळा करतात. ही तुलना कोठेतरी जुळून येते, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. तसेच, ट्रम्प हे इम्रान खान आणि नरेंद्र मोदी यांच्याशी 'डबल गेम' खेळत आहेत. त्यांचा हा डाव समजण्याची गरज आहे,' असा इशारा सुद्धा यालेळी असदुद्दीन ओवेसी यांनी दिला आहे.