नवी दिल्ली/वॉशिंग्टन : वर्ष २०२४ मध्ये भारत हा अमेरिकेचा १० व्या क्रमांकाचा व्यापारी भागीदार राहिला. मेक्सिको, कॅनडा आणि चीन हे देश व्यापारात पहिल्या तीन स्थानावर आहेत.
अमेरिका मात्र भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता हाती घेताच मेक्सिको व कॅनडावर २५ टक्के, तर चीनवर १० टक्के दंडात्मक कर लावला. याचा लाभ भारताला होऊ शकतो, असे जाणकारांना वाटते. २०१७ ते २०२१ या काळात अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ आय. जस्टर आणि माजी अमेरिकी व्यापार प्रतिनिधी मार्क लिन्स्कॉट यांनी एका लेखात म्हटले की, भारत आणि अमेरिका आपली आर्थिक भागीदारी वाढवून आशिया-प्रशांत क्षेत्रात चीनच्या वर्चस्वाला शह देऊ इच्छितात. मोठे करार करण्याची वेळ आता आली आहे.
देशांचे प्रमुख व्यक्तिगत प्रकरणासाठी भेटत नाहीत; अदानीप्रकरणी मोदींचे उत्तर
अदानी समूहाचे चेअरमन गौतम अदानी यांच्यावर आरोपांबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा झाली का, असे पत्रकारांनी विचारताच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, व्यक्तिगत प्रकरणांवर आमच्यात कोणताही चर्चा झाली नाही. पत्रकारांसमोर पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमची संस्कृती वसुधैव कुटुंबकम् हा संदेश देणारी आहे. आम्ही संपूर्ण जगाला एक परिवार मानतो. प्रत्येक भारतीयाला मी आपला मानतो. व्यक्तिगत प्रकरणासाठी दोन देशांचे प्रमुख ना कधी भेटतात, ना बैठक करतात, ना त्यावर चर्चा करतात.
काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गाधी यांनी यावर टीका करताना म्हटले आहे की, देशात विचारले तर मौन आणि परदेशात विचारले तर व्यक्तिगत प्रकरण! अमेरिकेतही पंतप्रधानांनी अदानी यांच्या भ्रष्टाचारावर पांघरूण टाकले आहे.
भारत अमेरिकेहून काय आयात करतो?भारत अमेरिकेहून आयात करीत असलेल्या वस्तूंत कच्चे तेल, त्यासंबंधीची उत्पादने, रत्ने व खडे, अणुभट्ट्या, विद्युत साहित्य आणि वैद्यकीय उपकरणे यांचा समावेश आहे.
अमेरिका भारताकडून काय आयात करते?भारतातून अमेरिकेला होणारी आयात वाढत आहे. अमेरिका भारताकडून आयात करीत असलेल्या वस्तूंत प्रामुख्याने अर्ध-मौल्यवान खडे आणि विद्युत यंत्रसामग्रीचा समावेश आहे.
अंतराळ सहकार्य वाढवणारपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात वॉशिंग्टनमध्ये झालेल्या भेटीत 'अमेरिका-भारत ट्रस्ट' उपक्रमाची घोषणा करण्यात आली. संरक्षण, एआय, सेमीकंडक्टर, क्वांटम, जैवतंत्रज्ञान, ऊर्जा आणि अंतराळ या क्षेत्रांत प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला. २०२५ हे वर्ष नागरी अंतराळ सहकार्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नासा-इस्रोच्या प्रयत्नांद्वारे पहिला भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठविण्याची योजना आहे. तसेच, संयुक्त 'निसार' मिशनद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदलांचे नकाशे तयार केले जातील.