नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यासाठी भारतात जय्यत तयारी सुरू करण्यात येत आहे. भारताच्या दृष्टीने ट्रम्प यांचा भारत दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या दौऱ्यात ट्रम्प गुजरातेतील अहमदाबादसह आग्रा शहराला भेट देण्यार असल्याचे समजते. आग्रा येथे ट्रम्प यांना यमुना नदीतील दुर्गंधीचा त्रास होऊ नये यासाठी उत्तर प्रदेश सरकारने खास खबरदारी घेतली आहे.
ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी यमुना नदीतील दुर्गंधी कमी करण्यासाठी उत्तर प्रदेश पाठबंधारे विभागने नियोजन केले असून गांधीनगर ते बुलंदशहर भागात 500 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. आग्रा येथे यमुनाच्या पाण्यातून दुर्गंधी येऊ नये यासाठी उपयोजना कऱण्यात आली आहे. दोन दिवसीय दौऱ्यावर असणारे ट्रम्प प्रामुख्याने दिल्लीला येणार आहेत. मात्र यावेळी ते इतर शहरांना देखील भेट देणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा शहराचा समावेश आहे.
पाठबंधारे विभागाचे अभियंते धर्मेंद्र सिंह फोगट यांनी म्हटले की, ट्रम्प यांचा आग्रा दौरा लक्षात घेता यमुना नदीचे पर्यावरण अधिक चांगले करण्यासाठी 500 क्सुयेक पाणी गांधीनगर येथून सोडण्यात आले आहे. हे पाणी मथुरा येथील यमुना नदीत 20 ते 21 फेब्रुवारी या कालावधीत पोहोचणार आहे. यमुना नदीत पाण्याची पातळी 24 फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवण्याच्या सूचना असल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी सोडल्यामुळे यमुना नदीतील दुर्गंधी कमी होईल, असं उत्तर प्रदेश प्रदुषण बोर्डाचे अभियंते अरविंद कुमार यांनी सांगितले.