अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा हा दोन देशांच्या संबंधांतील नवा अध्याय आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. तथापि, दोन्ही देशातील लोकांची प्रगती आणि समृद्धी यासाठीही हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मोदी म्हणाले.अहमदाबादेतील मोटेरा स्टेडियममध्ये ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांच्या स्वागतासाठी आयोजित ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत- अमेरिकेतील संबंध आता केवळ भागीदारीपर्यंत मर्यादित नाहीत. ते यापेक्षाही अधिक दृढ संबंध आहेत. हे व्दिपक्षीय संबंध आणखी पुढे जातील. आमची आर्थिक भागीदारी आणखी चांगली होईल. डिजिटल सहकार्य व्यापक होईल. २१ व्या शतकातील जगाची दिशा ठरविण्यात भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांची महत्वाची भूमिका असणार आहे. माझे स्पष्ट मत आहे की, भारत आणि अमेरिका नैसर्गिक सहयोगी आहेत. पूर्ण जगात शांतता, प्रगती आणि सुरक्षेत एक प्रभावी योगदान देऊ शकतात. आज जो देश भारताचा सर्वात मोठा व्यापारी सहयोगी आहे तो म्हणजे अमेरिका. आज भारताचे सैन्य सर्वाधिक युद्ध सराव अमेरिकेसोबत करत आहे. आज १३० कोटी भारतीय एकत्र येऊन न्यू इंडियाची निर्मिती करत आहेत. मोठे लक्ष्य ठेवणे, ते प्राप्त करणे ही आज न्यू इंडियाची ओळख झाली आहे. मोदी म्हणाले की, आज भारतात जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमच नाही तर, जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना सुरु आहे. देशात जगातील सर्वात मोठा सोलर पार्क आणि स्वच्छता कार्यक्रमही सुरु आहे. भारताने एकाच वेळी सर्वाधिक उपग्रह सोडण्याचा विश्वविक्रमच केला नाही तर, सर्वात वेगवान वित्तीय समावेशनचाही जागतिक रेकॉर्ड बनवित आहे. ‘मैत्री तीच असते जिथे विश्वास अतूट असतो’ असेही ते म्हणाले. मोदी म्हणाले की, एकता आणि विविधता भारत आणि अमेरिका यांच्यातील मजबूत नात्यांचा आधार आहे.एकाला स्टॅच्यु ऑफ लिबर्टीचा अभिमान आहे तर, दुसऱ्याला जगातील सर्वात उंच प्रतिमा सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ यूनिटीवर अभिमान आहे. मेलानिया ट्रम्प यांच्याबाबत बोलताना मोदी म्हणाले की, समाजातील मुलांसाठी आपण जे करत आहात ते प्रशंसनीय आहे. या कार्यक्रमास उपस्थित ट्रम्प यांची मुलगी इवांका, जावई जेरेड कुशनर यांचेही मोदी यांनी स्वागत केले.‘नमस्ते’चा काय आहे अर्थ?मोदी म्हणाले की, या कार्यक्रमाचे नाव ‘नमस्ते ट्रम्प’ असे आहे. नमस्तेचा अर्थ खोल, व्यापक आहे. जगातील प्राचीन भाषांपैकी एक संस्कृतचा हा शब्द आहे.यामागे असा अर्थ आहे की, केवळ व्यक्तीलाच नव्हे तर, त्याच्यातील व्याप्त अध्यात्मालाही नमन.
Donald Trump Visit: भारत-अमेरिका संबंधातील नवा अध्याय; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 2:11 AM