अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जादू की झप्पी देत नेहमीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं आहे. अहमदाबादमध्ये मोदी व ट्रम्प यांचा रोड शो व त्यानंतर मोटेरा स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम पार पडला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाला 'एअर फोर्स वन' म्हटलं जातं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानाला 'एअर इंडिया वन' म्हणतात. या दोन्ही विमानातील फरक जाणून घ्या.
भारताच्या पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यासाठी एअर इंडियाचे विशेष विमान असते. या विमानाला 'एअर इंडिया वन' असं म्हटलं जातं. हे बोईंग 747-400 विमान आहे. भारताचे पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या परदेश दौऱ्यात हे विमान वापरण्यात येते. तर, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या विशेष विमानाला 'एअर फोर्स वन' असं म्हटलं जातं. हे बोईंग 747-200B या सीरिजमधील विमानांपैकी एक विमान आहे.
एअर इंडिया वन हा जणू उडत्या किल्ल्यासारखाच आहे. यामध्ये अत्याधुनिक संपर्क उपकरणे आहेत. एअर इंडिया वन हे विमान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील द एअर हेडक्वॉर्टर्स कम्युनिकेशन स्क्वॅड्रनच्या ताब्यात असते.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विमान हे अमेरिकी हवाई दलाच्या ताब्यात असते. ट्रम्प यांच्या विमानालाही उडणारे व्हाइट हाऊस असे संबोधण्यात येते. विमानातून प्रवास करताना अमेरिकी अध्यक्ष कोणासोबतही संपर्क करू शकतात, संवाद साधू शकतात. अमेरिकेवर हल्ला झाल्यास या विमानाला मोबाईल कमांड केंद्राप्रमाणे याचा वापर करू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यात एअर इंडिया वन या विमानाचे रुपांतर मिनी पीएमओमध्ये होते. या विमानामध्ये अत्याधुनिक संपर्क यंत्रणा आहेत. एअर फोर्स वनमध्ये अत्याधुनिक आणि सुरक्षित संपर्क यंत्रणा आहेत. त्यामुळे हे विमान आधुनिक आणि सुरक्षित कमांड केंद्र म्हणून काम करू शकते.
एअर इंडिया वन हे विमान मागील 26 वर्षांपासून भारताच्या पंतप्रधानांच्या सेवेत आहे. त्याच्याऐवजी बोईंग 700 -300ER या वर्षी जुलैमध्ये भारतात दाखल होणार आहे. बोईंगने 777-300 ER या सीरिजमधील दोन विमाने गेल्या वर्षी जानेवारीत पाठवली होती. या दोन विमानांमध्ये अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा जोडण्यासाठी अमेरिकेत पाठवण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यावर १०० कोटी वाया गेले नाहीत; 'असा' आहे भारताचा जागतिक प्लॅन
ट्रम्प यांचं फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षाही भारी विमान, याच्या भन्नाट गोष्टी वाचून व्हाल हैराण!
...तर डोनाल्ड ट्रम्प कुटुंबाने रांगेत उभं राहून शिवथाळीची चव चाखली असती!