अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात अहमदाबाद येथे आगमन झाले आहे. दौऱ्याच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधींच्या आश्रमाबाबत माहिती दिली. तसेच ट्रम्प यांनी आश्रमातील चरख्यावर सूतकताई केली.
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण 36 तासांच्या भारत दौऱ्यात अधिकृत कामांसाठी ठेवलेला वेळ जेमतेम तीन तासांचा आहे. यापैकी मंगळवारी दुपारी दिल्लीत डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी यांच्यात सुमारे दीड तास अधिकृत भेट व चर्चा होईल. डोनाल्ड ट्रम्प प्रथमच भारतात येत असले तरी मोदी चार वेळा अमेरिकेला गेले तेव्हा व तीन वेळा अन्य निमित्ताने दोघांची भेट झालेली असून दोन्ही नेत्यांमधील व्यक्तिगत ‘रॅपो’ हे या दौ-याच्या यशापयशाचे मुख्य गमक असणार आहे. डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी प्रत्येकी पाच वर्षांच्या अंतराने अनुक्रमे बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता.