नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प यासुद्धा येणार आहेत. दरम्यान, मेलेनिया ट्रम्प ह्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यादरम्यान दिल्लीतील सरकारी शाळेला भेट देणार असून, तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. 25 फेब्रुवारी रोजी मेलेनिया ट्रम्प या शाळेला भेट देणार असून, त्यावेळी त्यांना हॅपीनेस क्लासबाबत माहिती देण्यात येणार आहे. मेलेनिया ट्रम्प ह्या दक्षिण दिल्लीमधील एका सरकाळी शाळेतील मुलांची भेट घेणार आहेत. त्यांची ही भेट सुमारे एक तास चालेल. या दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेच्या फर्स्ट लेडींनी दिल्लीतील शालेय विद्यार्थ्यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी 2010 मध्ये तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीवेळी त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मुंबईत मुलांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी मुलांसोबत केलेले नृत्य चर्चेचा विषय ठरले होते.
संबंधित बातम्या