अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौऱ्याकडे देशाचे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील लष्करी तळावरून ट्रम्प आणि त्यांच्यासोबत येणारे कुटुंबीय व वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ शनिवारी सकाळी 11.30 वाजता अहमदाबाद येथील सरदार वल्लभाई पटेल विमानतळावर दाखल झाले. यावेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत: ट्रम्प दाम्पत्याचे स्वागत केले.
मी भारत दौऱ्यासाठी उत्साही असून आमचे ग्रँड वेलकम होणार असल्याचे मोदींनी सांगितल्याचं ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आज सकाळी अहमदाबादमध्ये ट्रम्प यांचे स्वागत करण्यात आले. 14 तासांचा प्रवास करून ते भारतभूमीवर उतरले. विमानतळावरुन थेट महात्मा गांधींच्या आश्रमाला प्रथम भेट दिली. त्यानंतर, साबरमती आश्रमाचा संपूर्ण परिसर डोनाल्ड आणि मेलानिया ट्रम्प यांनी मोदींसमवेत पाहिला. त्यावेळी, महात्मा गांधींच्या चरख्यावर सुतकताईचं कामही ट्रम्प दाम्पत्यांनी केलं. यावेळी, मोदींनी महात्मा गांधींच्या आश्रमातील विविध वस्तू आणि आश्रमाची माहिती दिली. तसेच, महात्मा गांधींचे आत्मचरित्र पुस्तही भेट दिले. महात्मा गांधींच्या आश्रमाला भेट देऊन ट्रम्प यांनाही आनंद झाला आहे.
साबरमती आश्रमातील अभिप्राय नोंद वहीत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक संदेश लिहिला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. या संदेशाला अनुमती दर्शवत मेलानिया ट्रम्प यांनीही आपली स्वाक्षरी केली. ''टू माय ग्रेट फ्रेंड प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी... थँक्यू फॉर दिस वंडरफुल्ल व्हिसीट'' असा मेसेज ट्रम्प यांनी लिहिला आहे. मात्र, या अभिप्राय पुस्तकावर ट्रम्प यांनी महात्मा गांधी किंवा साबरमती आश्रमाबद्दल काहीच लिहिले नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. कारण, साबरमती आश्रमातील शुभेच्छा संदेशात गांधींचा विसर पडल्याचं त्यांच्या अभिप्रायावरुन दिसून येत आहे. तर, मोदींचा खास उल्लेख करत माय ग्रेट फ्रेंड असे ट्रम्प यांनी लिहिले आहे.