लस घेतल्यानंतर पंतप्रधान निधीत ५०० रुपयांची मदत करा; भाजपाच्या मंत्र्यांचं अजब आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 15:52 IST2021-07-02T15:51:27+5:302021-07-02T15:52:29+5:30
कोरोना विरोधी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेत पंतप्रधान निधीमध्ये (PM Cares Fund) प्रत्येकी ५०० रुपयांची मदत करावी, असं आवाहन.

लस घेतल्यानंतर पंतप्रधान निधीत ५०० रुपयांची मदत करा; भाजपाच्या मंत्र्यांचं अजब आवाहन
मध्यप्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री आणि भाजपा नेत्या उषा ठाकूर यांनी जनतेला एक वेगळंच आवाहन केलं आहे. कोरोना विरोधी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेत पंतप्रधान निधीमध्ये (PM Cares Fund) प्रत्येकी ५०० रुपयांची मदत करावी, असं आवाहन उषा ठाकूर यांनी केलं आहे. इंदौर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
"कोरोना महामारीमुळे देशातील सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे हात जोडून सर्वांना आवाहन करते की कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण झालेल्यांनी पंतप्रधान मदत निधीत प्रत्येकी ५०० रुपयांची मदत करावी. आपल्याला माहितच आहे की एका डोसची किंमत २५० रुपये आहे. जर आपल्याला सरकारकडून कोरोनाचे दोन्ही डोस मोफत मिळत असतील तर ज्यांना शक्य आहे त्यांनी ५०० रुपये मदतनिधी म्हणून देण्यास काहीच हरकत नाही. ही माझी विनंती आहे", असं उषा ठाकूर म्हणाल्या.
संपूर्ण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोफत लसीकरण उपलब्ध करुन दिल्याबद्दल आम्ही आभारी आहोत, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, मे महिन्यात उषा ठाकूर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं होतं. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून दूर ठेवण्यासाठी आजूबाजूचं वातावरण शुद्ध करण्याची गरज आहे आणि त्यासाठी महायज्ञ करण्याची नितांत गरज असल्याचं उषा ठाकूर म्हणाल्या होत्या.