ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकच्या ' इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन' (आयआरएफ) या संस्थेकडून 'राजीव गांधी फाऊंडेशन'ला ५० लाख रुपयांची देणगी दिल्याचे वृत्त ' टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. २०११ साली
'इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन' ही देणगी देण्यात आली असून आयआरएफनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. देणगी म्हणून देण्यात आलेली ही रक्कम स्वीकारली असली तरीही आयआरएफने ही रक्कम 'राजीव गांधी फाऊंडेशन'ला नव्हे तर 'राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट'ला दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
महिलांचे शिक्षण, मुलींना मेडिसिन आणि सर्जरीच्या उच्च शिक्षणासाठी मदत करण्यासाठी 2011 मध्ये इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनने ही रक्कम राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला देणगी म्हणून दिली होती, अशी माहिती समोर येत आहे. आम्ही ज्याप्रमाणे इतर संस्थाना देणगी देतो त्याचप्रमाणे राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला ही रक्कम देणगीदाखल देण्यात आली, असे प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.
आयआरएफ संस्थेकडून आलेली देणगीची ही रक्कम स्वीकारली होती, मात्र झाकीर नाईक यांच्यासंबंधी सुरू असलेल्या विवादानंतर सर्व कागदपत्रे पाहिली व काही महिन्यांपूर्वीच देणगीची ही रक्कम परत केल्याचा दावाही काँग्रेसतर्फे करण्यात आला आहे.
तर काँग्रेसने परत केलेली रक्कम अद्याप आमच्या खात्यात जमा झालेली नाही, असं आयआरएफच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी या संस्थेचे संस्थापक असून माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे ट्रस्टी आहेत.