चीनकडून राजीव गांधी फाऊंडेशनला डोनेशन; केंद्रीय मंत्र्यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 06:34 PM2020-06-25T18:34:17+5:302020-06-25T18:41:15+5:30
कायद्यानुसार कोणत्याही पक्षाला सरकारच्या परवानगीशिवाय परदेशी पैसे घेता येऊ शकत नाही. मग चीनकडून येणाऱ्या या पैशासाठी काँग्रेसने सरकारची परवानगी घेतली होती का?
नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना टीकेचं लक्ष्य करत आहेत, अशातच आता भाजपानेही काँग्रेसविरोधात आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. चीनकडूनराजीव गांधी फाऊंडेशनला फंडिंग होत आहे. चीनचं इतकं प्रेम कसं वाढलं. काँग्रेस कार्यकाळातच चीनने भारताच्या जमिनीवर कब्जा केला होता असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
याबाबत रविशंकर प्रसाद म्हणाले की, कायद्यानुसार कोणत्याही पक्षाला सरकारच्या परवानगीशिवाय परदेशी पैसे घेता येऊ शकत नाही. मग चीनकडून येणाऱ्या या पैशासाठी काँग्रेसने सरकारची परवानगी घेतली होती का? हे स्पष्ट करावं. २००५-०६ मधील राजीव गांधी फाऊंडेशनच्या डोनरची यादी आहे. यात चीनच्या एम्बेसीकडून डोनेशन मिळाल्याचं स्पष्ट लिहिलं आहे. असं काय झालं? का गरज भासली? यात अनेक उद्योगपतींची, पीएसयू यांची नावे आहेत. इतकं असतानाही चीनच्या एम्बेसीकडून पैसे घ्यावे लागले असं त्यांनी सांगितले.
तसेच हे सगळं जाणूनबुजून केलेल्या रणनीतीचा भाग आहे का? ज्यानंतर काँग्रेस सरकारमध्ये भारत आणि चीन यांच्यातील व्यापारी तोटा अनेक पटीने वाढला. चीनबद्दल काँग्रेसला इतकं प्रेम का आहे? की चीनसोबत काँग्रेसचे एमओयू साइन होत आहेत का? राजीव गांधी फाऊंडेशनला चिनी दूतावासाकडून पैसे पुरवले जातात असा आरोप केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. एकेकाळी कॉंग्रेसच्या राजवटीत चीनला आपल्या देशाचा इतका मोठा भूभाग दिला. दहा वर्षांच्या शासनकाळात कॉंग्रेसच्या लोकांनी चीनसमोर गुडघे टेकले. जेव्हा चीनबाबत प्रश्न विचारला की संरक्षणमंत्र्यांना प्रभावी उत्तरे देता येत नव्हती असंही रविशंकर प्रसाद म्हणाले.
तसेच कायद्यानुसार कोणतीही संस्था जर परदेशी फंड घेत असेल तर त्याच्याशी संबंधित सर्व माहिती सरकारला देणे आवश्यक असते. राजीव गांधी फाऊंडेशनला चीनमधून आलेल्या डोनेशनची माहिती सरकारला दिली होती का? त्यांनी कोणत्या अटींवर हे डोनेशन घेतले आणि त्याचा उपयोग कसा केला? जर सरकारला माहिती नसेल तर का माहिती दिली नाही. आपण चीनकडून व्यापाराशिवाय पैसे घेतो का? असा सवालही भाजपानेही उपस्थित केला आहे.
भाजपशी संबंधित सूत्रांनी अशी माहिती दिली की, भारतातील चिनी उच्चायोग, राजीव गांधी फाउंडेशन (आरजीएफ) साठी दीर्घ काळापासून निधी देत आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या राजीव गांधी फाऊंडेशनच्या अध्यक्षा आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या मंडळाचे सदस्य आहेत.