नवी दिल्ली - टीम इंडियाचा धडाकेबाज माजी फलंदाज आणि नवनिर्वाचित खासदारगौतम गंभीर आपली संपूर्ण पगार समाज कार्यासाठी दान करणार आहे. खासदार म्हणून मिळणार पगार दिल्लीतील स्मशानभूमीच्या नवनिर्माणासाठी देणार आहे. गौतम गंभीर ज्याप्रमाणे एक आक्रमक फलंदाज होता, तितकाच संवेदनशील माणूस आहे. नुकतेच राजकीय मैदानावर फटकेबाजी करण्यास गौतम गंभीरने सुरुवात केली आहे.
गौतम गंभीर आपल्या समाजकार्यासाठी आणि सामाजिक जाणिवेतून केलेल्या कामासाठी नेहमीच ओळखला जातो. आता, खासदार झाल्यानंतरही तो जबाबदारीने आपलं काम करताना दिसत आहे. गौतमने नुकतेच गीता कॉलोनी श्मशान घाट येथील परिसराचा दौरा केला. त्यामुळे या स्मशान भूमिपासूनच कामाची सुरुवात करण्याचा निर्णय गौतमने घेतला आहे. ईस्ट दिल्लीतील सर्वच स्मशान भूमी आणि तेथील परिसराचे पुनर्निर्माणासाठी करण्याचा निर्णय गौतमने घेतला आहे. त्यासाठी, आपला खासदारकीचा संपूर्ण पगार गौतम गंभीर देणार आहे. परिसरातील काही पर्यावरणप्रेमी मित्र आणि संघटनांशीही गौतम संपर्कात असून पर्यावरणपूरक कामे करण्यास तो उत्सुक आहे.
स्मशान घाट येथील परिसरात शेड बसवणे, पाणी, नवीन प्लॅटफॉर्म, लोकांना बसण्यासाठी बेंच यांसह इतरही कामे प्राधान्यक्रमाने आहेत. गौतमने 9 जुलै रोजी ट्विट करुन मी खासदार म्हणून मला मिळणारा पगार समाजकार्यासाठी देणार असल्याचे म्हटले होते. राजकारण हे शहरातील लोकांची मदत करण्यासाठी मी निवडलेला एक मार्ग आहे. त्यामुळेच, एक खासदार म्हणून मला मिळणारा पगार मी, माझ्या मतदारसंघातील लोकांच्या कल्याणासाठी आणि सुख-सुविधांसाठी वापरणार असल्याचे गौतमने ट्विट करुन म्हटले आहे. त्यामुळेच ईस्ट दिल्लीच्या विकासासाठी, येथील स्मशान भूमीच्या पुनर्निर्माणासाठी या पैशाचा वापर केला जाईल, असेही गौतमने म्हटले आहे.