ऑनलाइन लोकमत
चंदिगड, दि. 5 - हरियाणामधील झज्जर येथील बेरीमध्ये प्राण्यांचा मेळावा लागला असून यावेळी सर्वांच लक्ष एका गाढवाकडे लागलं आहे. सोनू असं नाव असलेल्या या गाढवाला खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली आहे, मात्र या गाढवाचा मालक राजू कुमार आपल्या या लाडक्या गाढवाला विकायला तयार नाही. एवढंच कशाला गाढवासाठी पाच लाख रुपये देण्याचा प्रस्तावही राजू कुमारने फेटाळून लावला.
गडद रंगाचा सोनू हा एक स्मार्ट गाढव म्हणून ओळखला जातो. त्याची उंची 55 इंच इतकी आहे. इतर गाढवांशी तुलना करता सोनूची उंची खूप जास्त आहे. सामान्य गाढवांची उंची 20 ते 30 इंच इतकी असते. विशेष म्हणजे सोनूच्या जिवावरच राजू कुमार यांचं पोट भरत आहे. राजू कुमार यांचा व्यवसाय यशस्वी असून सोनूची यामध्ये मुख्य भूमिका आहे. मादी गाढव पाळणारे व्यवसायिक गाढवांना घेऊन सोनूकडे येतात. यासाठी राजू कुमार पाच ते आठ हजार रुपये घेतात. सोनू प्रत्येक सिजनमध्ये कमीत कमी दोन लाख रुपये कमवतो. खासकरुन उन्हाळ्यात सोनूची कमाई जास्त असते.
आपल्या गाढवाला विकायचं नसतानाही त्याला घेऊन मेळाव्यात का आला असं विचारला असता राजू कुमारने सांगितलं की, "मला माझ्या या लाडक्या गाढवाचं प्रदर्शन करण्यासाठी ही जागा योग्य वाटली". राजू सोनीपत जिल्ह्यातील बंस गावात राहतो. राजू लोकांना भेटल्यावर आपलं व्हिजिटिंग कार्ड देतो. राजूने सांगितलं की, "सोनू आमच्या घरी जन्माला आला असून मला तो मुलासारखा आहे. त्याची देखभाल, जेवण आणि इतर गोष्टींसाठी महिन्याला कमीत कमी 17 हजार खर्च करतो".