भाजपच्या देणग्या एका वर्षात 200 टक्क्यांनी वाढल्या, इतर राजकीय पक्षांची काय स्थिती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 21:45 IST2025-04-07T21:44:12+5:302025-04-07T21:45:11+5:30
काँग्रेसला किती देणग्या मिळाल्या? पाहा...

भाजपच्या देणग्या एका वर्षात 200 टक्क्यांनी वाढल्या, इतर राजकीय पक्षांची काय स्थिती?
BJP : भारतीय जनता पक्षाला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी वाढ झाली होती. या आर्थिक वर्षात भाजपला 2243 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे, जी 2022-23 च्या तुलनेत 1524 कोटी रुपये जास्त आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (ADR) च्या अहवालानुसार, सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला किती देणग्या मिळाल्या, याची माहिती दिली आहे. त्यानुसार राजकीय पक्षांना संपूर्ण आर्थिक वर्षात 2544.278 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळाली आहे.
भाजपला मिळालेल्या देणग्या 2022-23 या आर्थिक वर्षातील 719.858 कोटी रुपयांवरून 2023-24 या आर्थिक वर्षात 2,243.94 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. ADR अहवालात असे म्हटले आहे की, काँग्रेसला मिळालेल्या देणग्याही आर्थिक वर्ष 2022-23 मधील 79.924 कोटी रुपयांवरून 2023-24 आर्थिक वर्षात 281.48 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. म्हणजेच, यात 252.18 टक्के वाढ झाली आहे.
काँग्रेसला किती देणग्या मिळाल्या?
राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या घोषित देणग्यांची एकूण रक्कम 2,544.28 कोटी रुपये आहे, जी 12,547 देणगीदारांकडून प्राप्त झाली आहे. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 199 टक्क्यांनी अधिक आहे. एकट्या भाजपच्या घोषित देणग्यांचा एकूण वाटा 88 टक्के आहे. तर, 1994 लोकांकडून मिळालेल्या 281.48 कोटी रुपयांच्या देणग्यांसह काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे.
एडीआरच्या अहवालानुसार 2023-24 मध्ये आम आदमी पार्टी आणि नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीईपी) च्या देणग्यांमध्ये मोठी घट झाली आहे. मागील आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत, 2023-24 मध्ये AAP ला मिळालेल्या देणग्या 70.18 टक्क्यांनी कमी झाल्या. म्हणजेच, आम आदमी पार्टीला फक्त 11 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या.