नवी दिल्ली : काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यासाठी निमित्त होते ते लसीकरण मोहिमेसाठी तयार करण्यात आलेले कोविन ॲप लसीकरणाच्या नोंदींकरिता केलेले हे ॲप अप्रतिम आहे असे थरूर म्हणाले. त्यांनी केलेल्या या मोदीस्तुतीमुळे काँग्रेस नेते मात्र बुचकळ्यात पडले आहेत.शशी थरुर म्हणाले की, मोदी सरकारने जेव्हा चांगले काम केले, त्यावेळी मी हातचे काही राखून न ठेवता या सरकारचे नेहमीच कौतुक केले आहे. कोविन ॲप हे अतिशय विचारपूर्वक बनविले आहे. विदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र त्यांच्या पासपोर्टशी लिंक करण्याची सोयही या ॲपमध्ये आहे. जर या प्रमाणपत्रावरील तुमच्या माहितीमध्ये काही चूक झाली असेल तर ती सुधारण्याची सोयही या ॲपमध्ये आहे.
कोविनच्या निमित्ताने शशी थरूर यांनी केलेल्या स्तुतीमुळे काँग्रेस नेते बुचकळ्यात पडले आहेत. मोदी सरकारने कोणतीच उत्तम कामगिरी केलेली नाही अशी टीका काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी करीत असताना, शशी थरूर यांनी केलेल्या कौतुकामुळे त्या पक्षाची पंचाईत होण्याची शक्यता आहे. पेगॅससच्या मुद्द्यावरून काँग्रेसने इतर विरोधी पक्षांच्या साथीने संसदेचे कामकाज रोखून धरले. संसदेबाहेरही काँग्रेस सातत्याने मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहे. पण थरूर यांच्या उद्गारांनी काँग्रेसची अडचण होऊ शकते. दोन वर्षांपूर्वीही शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तम कामाबद्दल स्तुती केली होती. त्यावेळी या वक्तव्यावर केरळ काँग्रसने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.भाजप खासदारांचे पेगॅससवरील चर्चेत अडथळेमाहिती तंत्रज्ञान या विषयावरील संसदीय समितीच्या २८ जुलैच्या बैठकीत भाजप खासदारांनी अडथळे निर्माण केले. पेगॅससच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये असे या खासदारांना वाटत होते असा आरोप या समितीचे अध्यक्ष व काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केला. या समितीसमोर विविध केंद्रीय खात्यातील अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलाविले होते. पण या अधिकाऱ्यांनी हजर राहू नये असा त्यांना आदेश देण्यात आला होता अशीही टीका थरुर यांनी केली. माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय समितीच्या पुढच्या बैठकीत पेगॅससवर नक्की चर्चा होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.