वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यावरून देशभरात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांच्या धार्मिक असंतुलनाच्या वक्तव्यावर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात त्यांनी मोहन भागवतांना प्रत्यूत्तर दिले आहे.
चिंता करून करा, मुस्लिम लोकसंख्या वाढत नाहीय उलट कमी होत आहे. सर्वाधिक कंडोमचा वापर कोण करत आहे? आम्हीच आहोत. यावर मोहन भागवत काही बोलणार नाहीत, असे उत्तर ओवेसी यांनी दिले आहे. एका सभेला संबोधित करत असताना ओवेसी यांनी मुस्लिम लोकसंख्या नियंत्रणासाठी काय काय करत आहेत, ते सांगितले. दोन मुलांमधील सर्वाधिक अंतरही मुस्लिम ठेवत असल्याचा दावाही ओवेसी यांनी केला.
नागपूरमधील दसरा रॅलीवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी भारताने सर्वसमावेशक विचार करून लोकसंख्या धोरण तयार केले पाहिजे आणि ते सर्व समाजाला समानपणे लागू केले पाहिजे. समुदाय आधारित लोकसंख्या असमतोल हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असे म्हटले होते.
ओवेसी सतत या मुद्द्यावर बोलत आहेत. आरएसएस प्रमुखांच्या या वक्तव्यावर त्यांनी बुधवारी एक ट्विटही केले होते. देशात लोकसंख्या नियंत्रणाची गरज नाही, कारण देशाने त्याचा दर आधीच गाठला आहे, असे ते म्हटले होते.