नवी दिल्ली - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे राहणाऱ्या २० वर्षीय युवतीने सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांसमोरच तिच्या नातेवाईकांना स्वत:चा जीव देण्याची धमकी दिली. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना आदेश देत मुलीला सुरक्षा देण्याची सूचना केली. परंतु त्याचसोबत सुप्रीम कोर्टाने युवतीला चांगलेच फटकारले. या युवतीचे एका युवकासोबत प्रेम प्रकरण सुरू होते त्यामुळे तिने घरातून पळ काढला होता.
युवतीने स्वत:चे वडील आणि भाऊ यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप केला. भावाने माझा पाठलाग करत बळजबरीने मला घरी घेऊन गेला. मला भावासोबत जायचे नव्हते. युवती वाराणसी इथं तिच्या प्रियकरासोबत राहत होती आणि तिला पुन्हा भोपाळला तिच्या घरी जायचे नव्हते. सुनावणीवेळी २० वर्षीय युवतीने न्या. बेला माधुर्य त्रिवेदी यांचं ऐकले नाही तेव्हा न्यायमूर्तींनी तिचे कान उपटले. तुझ्या वयापेक्षा जास्त स्मार्ट बनू नको. ज्यांच्यावर तू टॉर्चर करत असल्याचा आरोप करतेय ते तुझ्यावर प्रेम करतात आणि त्यांना तुझी चिंता आहे असं न्यायाधीश म्हणाल्या.
काय आहे प्रकरण?हे प्रकरण मध्य प्रदेशातील भोपाळमधील आहे. ज्याठिकाणी एक युवतीच्या तिच्या घरातील ड्रायव्हरसोबत पळून दिल्लीला गेली. घरच्यांनी ड्रायव्हरविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करत पोलीस स्टेशनला तक्रार केली. FIR मध्ये संबंधित युवकावर याआधीही २ मुलींना बहाणा करून त्यांना पळवून घेऊन गेल्याचा गुन्हा दाखल असल्याचा हवाला देण्यात आला. आरोपी ड्रायव्हरने अटकपूर्व जामिनासाठी भोपाळच्या जिल्हा न्यायालयात आणि नंतर मध्यप्रदेश उच्च न्यायालयात अर्ज केला. मात्र त्याचा अर्ज सर्वत्र फेटाळण्यात आला. आता त्याने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला असून, त्यावर मंगळवारी सुनावणी झाली.
न्यायमूर्ती बेला माधुर्य त्रिवेदी आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आले. त्यानंतर एका वकिलाच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्या युवतीने न्यायाधीशांशी बोलण्याची विनंती केली. त्यानंतर मोबाईल न्यायाधीशांना दिला. प्रश्नोत्तरे सुरू झाली.
न्यायमूर्ती त्रिवेदी - काय बोलायचे ते सांगा!मुलीने थेट सांगितले की, मी तीच मुलगी आहे जिच्यावर खटला सुरू आहे. मला माझ्या कुटुंबीयांकडून जीवाला धोका आहे.न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी विचारले की, आता तुमच्या खटल्याची सुनावणी सुरू असल्याचे तुम्हाला कसे कळले?मुलीने सांगितले की, तिच्या एका मित्राने सांगितले आहे.कोर्ट - कोणत्या मित्राने सांगितले?मुलगी - मी तुम्हाला ते सांगू शकत नाही. माझ्या कुटुंबीयांकडून माझ्या जीवाला धोका आहे. मात्र मी या न्यायालयाच्या आवारात उपस्थित आहे.
मुलीने दिलेल्या सूचनेवरून न्यायाधीशांनी मुलीला कोर्टात बोलावले. तरुणीला साध्या वेशातील महिला पोलिसांसोबत आणण्यात आले. मुलगी कोर्टरूममध्ये आल्यावर न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी विचारले की अखेर हे काय आहे? मुलीने थेट घरच्यांवर आरोप केला की, ते तिला पुढे शिक्षण घेऊ देत नाहीत. जेव्हा मला शिक्षण घ्यायचे असते तेव्हा घरातील लोक टॉर्चर करतात. न्यायमूर्ती त्रिवेदी यांनी मुलीच्या इच्छेनुसार दिल्ली पोलिसांच्या सुरक्षेत मुलीला वाराणसीला पाठवण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. मात्र न्यायालयात मुलगी आणि न्यायमूर्ती त्रिवेदी यांच्यातील संवादाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुलीने वडील आणि भावाने खूप टॉर्चर केल्याचा आरोप केल्याने न्यायमूर्ती त्रिवेदी यांच्या संयमाचा बांध फुटला.
त्या म्हणाल्या की, बस्स कर, तू तुझ्या वयापेक्षा जास्त हुशार होण्याचा प्रयत्न करू नको. ज्याला तू टॉर्चर म्हणते ती त्यांची काळजी आणि तुझ्यावरील प्रेम आहे. मला हे प्रकरण गंभीर वाटते. तू जाऊ शकते.” यानंतर पोलीस संरक्षणात मुलीला कोर्टातून बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यानंतर परस्पर चर्चा करून न्यायालयाने आरोपी तरुणाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यानंतर आरोपी तरुणाला पोलीस किंवा कोर्टासमोर आत्मसमर्पण करण्याशिवाय पर्याय उरला नाही.