प्रशांत किशोर यांनी काढली तिसऱ्या आघाडीची हवा? शरद पवारांच्या 'पॉवरफुल' बैठकीआधी म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 12:16 PM2021-06-22T12:16:54+5:302021-06-22T12:19:30+5:30
दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी आज भाजप विरोधी पक्षांची बैठक; काँग्रेसकडून कोणीही उपस्थित राहणार नाही
नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. या बैठकीला काँग्रेस वगळता भाजप विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीआधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. शरद पवार यांनी गेल्या दोन आठवड्यांत दोनदा किशोर यांची भेट घेतली. यानंतर किशोर यांनी केलेलं विधान अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे.
राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; राऊतांनी सांगितलं शिवसेनेचं राज'कारण'
शरद पवार यांच्या निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला काँग्रेस वगळता इतर भाजप विरोधी पक्ष सहभागी होत आहेत. यात तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे लोकसभेच्या पुढील निवडणुकीत पवार तिसरी आघाडी तयार आहेत का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर एक अतिशय महत्त्वाचं विधान केलं आहे. 'माझा तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीवर विश्वास नाही. तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देईल यावर माझा विश्वास नाही,' असं किशोर यांनी म्हटलं आहे.
प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात काल दिल्लीत तीन तासांहून अधिक वेळ चर्चा झाली. गेल्या दोन आठवड्यातील ही दुसरी बैठक होती. याआधी पवार आणि किशोर मुंबईत 'सिल्व्हर ओक'वर ११ जूनला भेटले होते. ती भेटदेखील बराच वेळ सुरू होती. काल प्रशांत किशोर यांची भेट घेणार शरद पवार आज विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत मिशन २०२४ वर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.