नवी दिल्ली: भिन्न विचारसरणीच्या व्यक्तींना आम्ही शत्रू नव्हे, तर विरोधक मानतो. स्थापनेपासून हीच भाजपाची संस्कृती आहे, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. आमच्यापेक्षा वेगळी मतं मांडणाऱ्यांना आम्ही कधीही शत्रू मानलं नाही, असं त्यांनी भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त लिहिलेल्या ब्लॉगमध्ये नमूद केलं आहे. 6 एप्रिलला भाजपाचा 39 वा स्थापना आहे.कित्येक महिने जाहीर सभांमधून भाषणं न करणाऱ्या, संसदेतही मौन बाळगणाऱ्या अडवाणींनी ब्लॉगच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 'देश प्रथम, पक्ष नंतर आणि अखेर स्वत:,' या शीर्षकानं अडवाणींनी ब्लॉग लिहिला आहे. राजकीय विरोधकांना शत्रू समजण्याची भाजपाची संस्कृती नाही, असं मत व्यक्त करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. 'आमच्या मतांपासून फारकत घेणाऱ्या, आमचे विचार पटत नसलेल्यांना आम्ही कधीच शत्रू मानलं नाही. आम्ही त्यांना केवळ विरोधकच समजलं,' असं अडवाणींनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसनं त्यांच्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम हटवण्याचं आश्वासन दिलं. त्यावरुन सुरू असलेल्या राजकारणारदेखील अडवाणींनी ब्लॉगमध्ये भाष्य केलं. 'भारतीय राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेनुसार, आम्हाला राजकीय विरोध करणाऱ्यांना आम्ही कधीही देशद्रोही म्हटलं नाही. प्रत्येक नागरिकाला विचार स्वातंत्र्य आहे. वैयक्तिक आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर प्रत्येक नागरिक स्वतंत्र आहे, असं पक्ष मानतो,' अशा शब्दांमध्ये अडवाणींनी मोदींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. मोदींनी अनेकदा त्यांच्या सभांमध्ये 'काँग्रेसमुक्त भारत'चा पुनरुच्चार केला आहे. त्याचवरुन अडवाणींनी मोदींचं नाव न घेता त्यांना लक्ष्य केल्याचं बोललं जातं आहे.