नवी दिल्ली : माझे वक्तव्य कोणत्याही देशाबाबत किंवा सरकारबाबत नव्हते. ते एका व्यक्तीबाबत होते. मी भारताच्या लोकशाहीबद्दल बोललो. अन्य कोणत्याही देशाला यावर हस्तक्षेप करण्यास सांगितले नाही. यासाठी मला देशद्रोही म्हणता येणार नाही,’ असे स्पष्टीकरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या समितीच्या बैठकीत ब्रिटनमध्ये केलेल्या वक्तव्यावर दिले.
नाेटीस बजावण्यासाठी पोलिसांनी राहुल गांधींशी संपर्क साधण्याची पाच दिवसातील ही तिसरी वेळ होती. राहुल गांधी शुक्रवारी लोकसभेत पोहोचले. मात्र, कामकाज तहकूब झाल्यानंतर काँग्रेससह १६ विरोधी पक्षांनी संसदेबाहेर धरणे आंदोलन केले. परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी संसदीय सल्लागार समितीची बैठक बोलावली होती.
‘हा भारताचा अंतर्गत मुद्दा’ ‘काही नेते परदेशात भारतीय लोकशाहीबद्दल बोलून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत,’ अशी टीका भाजपच्या एका खासदाराने केली. यानंतर राहुल गांधी यांनी या वक्तव्यावर खुलासा केला. राहुल म्हणाले, ‘लंडनमध्ये मी फक्त भारतीय लोकशाहीचा मुद्दा उपस्थित केला आणि मला विश्वास आहे की हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे आणि आम्ही तो सोडवू.’
संसदेतच बोला : जयशंकरसूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, भाजप खासदाराने राहुल यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि अशा मुद्द्यांवर उत्तर देण्यासाठी हा योग्य मंच नसल्याचे सांगितले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी राहुल यांना पाठिंबा देत राहुल गांधींना स्पष्टीकरण देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे सांगितले. त्यावर एस. जयशंकर यांनी हा वाद थांबवत नेत्यांना याविषयी जे काही म्हणायचे असेल ते संसदेत बोलावे, असे सांगितले.