नवी दिल्ली - देशात सापडणाऱ्या विषाणूला ‘भारतीय स्ट्रेन’ किंवा ‘मोदी स्ट्रेन’ असे संबोधण्याचे कथित टूल किट जारी करून काँग्रेस जगभरात देशाची आणि विशेषत: पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करू पहात आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीने मंगळवारी केला. परंतु काँग्रेसने हे टूल किट बनावट असल्याचा सांगत याचा इन्कार केला आहे. आता, योगगुरू बाबा रामदेव यांनीही टूल किट प्रकरणावरुन अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
टूल किटप्रकरणावरु भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले असतानाच आता बाबा रामदेव यांनीही यात उडी घेतली आहे. बाबा रामदेव यांनी टूल किटवरुन 100 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदूंना बदनाम करू नका, असे म्हटलंय.
भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न
भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीट केले की, देशात कोरोना महामारीचे संकट असताना राहुल गांधी मात्र या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याची संधी शोधत आहेत, ही अतिशय शरमेची बाब आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देशातील कोरोना विषाणूला मोदी स्ट्रेन म्हणा, असे सांगितले जात आहे. टूल किटचा हवाला देत पात्रा यांनी म्हटले आहे की, काही परदेशी पत्रकारांच्या मदतीने काँग्रेस भारताची प्रतिमा मलिन करू पहात आहे.
भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करणार
काँग्रेसच्या रिसर्च विभागाला हे टूल किट बनावट असल्याचे आढळले आहे असे स्पष्ट करून पक्षाने या आरोपांचा साफ इन्कार केला आहे. पक्षाच्या वतीने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशातील जनतेला कोरोनापासून वाचविण्याऐवजी आपल्या सरकारला विरोधी पक्षांची बदनामी करण्यात अधिक रस आहे. काँग्रेसच्या रिसर्च विभागाचे प्रमुख राजीव गौडा यांनी ट्विट केले की, देशातील नागरिकांना कोरोनाच्या संकटातून दिलासा देण्याऐवजी भाजप लज्जास्पदपणे कटकारस्थाने करीत आहे. आम्ही जे. पी. नड्डा आणि संबित पात्रा यांच्याविरोधात बनावट कागदपत्रे तयार करण्याबाबत गुन्हा दाखल करणार आहोत.