बेंगळुरु : कर्नाटकात गेल्यावर्षीपासून काँग्रेस-निजदने हात मिळवत सत्ता स्थापन केली आहे. यामुळे निवडणुकीत बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपद हातचे गेल्याने येडीयुराप्पांनी संधी मिळेल तेव्हा सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. यावर केंद्रातील नव्या मोदी सरकारने येडीयुराप्पांनाच तंबी दिली आहे.
याबाबतची माहिती खुद्द येडीयुराप्पांनीच दिली आहे. गेल्या काही काळापासून काँग्रेस आणि जेडीयूमध्ये मंत्रिपद वाटपावरून धुसफूस सुरु होती. भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसने विनाशर्त कुमारस्वामींना पाठिंबा दिला होता. मात्र, मंत्रिमंडळामध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना स्थान न दिल्याने नाराजी पसरली होती. तसेच काँग्रेसचे नेते काम करू न देता त्रास देत असल्याचे सांगत कुमारस्वामींनीही अश्रु गाळले होते. यामुळे गुढघ्याला बाशिंग बांधून असलेल्या येडीयुराप्पांना दरवेळी संधी दिसत होती. यामुळे त्यांनी आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले होते.
येडीयुराप्पांनी सांगितले की, मी नुकताच दिल्लीहून आलो असून वरिष्ठ नेत्यांनी कर्नाटकचे सरकार अस्थिर होईल असे कोणतेही कृत्य करू नये अशा सूचना केल्या आहेत. राजकीय फायद्यासाठी सिद्धरामय्या त्यांचे काही आमदार माझ्याकडे पाठवू शकतात असे मला वाटते. मात्र, आम्ही आताही शांत आहेत. ते आपापसात लढू शकतात आणि काहीही होऊ शकते.
कर्नाटकच्या सरकारला कोणताही धोका नाही. काँग्रेसचे 79 आणि निजदचे 37 आमदार आहेत. भाजपाकडे 104 आमदार आहेत. लोकसभेदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून वाद झाले होते. यावेळी काँग्रेसने दोन नेत्यांना वाद सोडविण्यासाठी पाठविले होते. यावेळी काँग्रेसने सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले होते. येडीयुराप्पांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे 20 आमदार भाजमध्ये येणार असल्याचे वक्तव्य केले होते.