नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडतंय, त्याचवेळी सुप्रीम कोर्टाने VVPAT पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यात बॅलेट पेपरवर मतदान करण्याचीही मागणीही कोर्टाने नाकारली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे VVPAT स्लिपसह EVM द्वारे १००% मते मोजण्याच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने संमतीने हा निर्णय दिला आहे.
EVM मशीनद्वारेच मतदान होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने या महत्त्वपूर्ण निर्णयात स्पष्ट केलं आहे. EVM-VVPAT ची १०० टक्के पडताळणी केली जाणार नाही. VVPAT स्लिप ४५ दिवस सुरक्षित राहील. या स्लिप उमेदवारांच्या स्वाक्षरीने सुरक्षित ठेवल्या जातील. निवडणुकीनंतर चिन्ह लोडिंग युनिट्सही सील करून सुरक्षित ठेवाव्यात, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच निकाल जाहीर झाल्यानंतर तांत्रिक पथकाकडून ईव्हीएमचा मायक्रोकंट्रोलर प्रोग्राम तपासण्याचा पर्याय उमेदवारांना असेल, जो निवडणूक निकाल घोषणेच्या सात दिवसांच्या आत करता येईल.
तसेच VVPAT पडताळणीचा खर्च हा उमेदवाराला स्वत: उचलावा लागेल. जर कुठल्या स्थितीत EVM मध्ये काही दोष आढळला तर हा खर्च उमेदवाराला परत केला जाईल असं न्या. खन्ना यांनी म्हटलं. तर कोणत्याही व्यवस्थेवर आंधळेपणाने अविश्वास ठेवल्याने संशय निर्माण होतो. लोकशाही म्हणजे विश्वास आणि सुसंवाद राखणे असंही न्या.दीपांकर दत्ता यांनी निकालात सांगितले.
मार्च २०२३ मध्ये असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने EVM मते आणि VVPAT स्लिप्स यांची १०० टक्के मोजणी झाली पाहिजे अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सध्या, VVPAT पडताळणी अंतर्गत लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील फक्त पाच मतदान केंद्रांची EVM मते आणि VVPAT स्लिप जुळतात का ते पाहिले जाते. या महिन्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने निवडणूकीत निवडलेल्या पाच ईव्हीएमची पडताळणी करण्याऐवजी सर्व ईव्हीएम मतांची आणि व्हीव्हीपीएटी स्लिप्सची मोजणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर ईसीआयला नोटीस बजावली होती.
आता कुणालाही शंका नसावी - निवडणूक आयोग
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर कोणालाही शंका नसावी, आता जुने प्रश्न संपले पाहिजे जे प्रश्न मतदारांच्या मनात निर्माण होत आहेत. भविष्यातही निवडणूक सुधारणा सुरू राहतील असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे