"चीनप्रश्नी रशिया तुमच्या मदतीला धावून येईल अशी अपेक्षाच ठेवू नका, कारण...", अमेरिकेनं भारताला स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 08:06 PM2022-03-31T20:06:32+5:302022-03-31T20:06:59+5:30
अमेरिकेचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग यांनी रशियावरील निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या देशांना स्पष्ट इशाराच दिला आहे. तसंच भारत दौऱ्यात त्यांनी एक मोलाचा सल्ला भारताला देऊ केला आहे.
रशियाकडूनभारतानं आयातीत वाढ केल्याची माहिती जाणून घेण्यात अमेरिका अजिबात इच्छुक नाही. तसंच युक्रेनवरील हल्ल्यानंतर रशियावर जगभरात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचं उल्लंघन कोणत्याही देशानं करु नये, असा स्पष्ट संदेश अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दलीप सिंग यांनी दिला आहे. दलीप सिंग यांनी भारत दौऱ्यावर असताना हे रोखठोक विधान केलं आहे.
अमेरिकेनं रशियावर घातलेल्या आर्थिक निर्बंधांचे शिल्पकार म्हणून दलीप सिंग यांच्याकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे दलीप सिंग भारतीय वंशाचे असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या सरकारमध्ये त्यांना विशेष स्थान आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्याच पार्श्वभूमीवर भारताशी चर्चा करण्यासाठी ते भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी बोलताना दलीप सिंग यांनी भारत आणि चीनमधील सीमेच्या मुद्द्याला अनुसरून एक महत्वाचं विधान केलं आहे. "चीननं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या नियमांचं उल्लंघन केल्यास रशिया तुमची बाजू घेईल अशी अजिबात अपेक्षा ठेवू नका. कारण रशिया आणि चीन यांच्यात आता घट्ट मैत्री झालेली आहे", असं सूचक विधान दलीप सिंग यांनी केलं आहे.
जगाला युद्धाच्या पेचात घालणाऱ्या रशियावर लादण्यात आलेल्या निर्बंधांचं कोणत्याही देशाकडून उल्लंघन केलं जाऊ नये असं आम्हाला वाटतं. भारत आणि अमेरिकेच्या संबंधात काही वाईट घडलेलं नाही. पण जागतिक शांतता आणि सुरक्षिततेच्या मूलभूत तत्वाचं संरक्षण व्हावं यासाठी प्रामाणिक संवाद करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत, असं दलीप सिंग म्हणाले. ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.
"भारतानं रशियाकडून आयात वाढवलेली आम्हाला आवडणार नाही. विशेषत: ऊर्जा क्षेत्रात असं केलं जाऊ नये. कारण जागतिक निर्बंधांच्या दृष्टीनं उल्लंघन केल्याचं ठरू शकतं", असं दलीप सिंग म्हणाले. ते रशियाकडून स्वस्तात कच्च्या तेलाची आयात करण्याबाबत भारताला ऑफर आल्याच्या प्रश्नवरील उत्तरात बोलत होते. यूएस आर्थिक निर्बंधांमुळे ऊर्जा देयकांना सूट मिळते आणि रशियाकडून ऊर्जा आयातीवर सध्या कोणतीही बंदी नाही हे लक्षात घेता सिंग म्हणाले की, रशियासारख्या “अविश्वसनीय ऊर्जा पुरवठादार” देशावरील त्यांचं अवलंबन कमी करण्यातच अमेरिका आणि त्याच्या युरोपियन मित्र राष्ट्रांचं सामायिक हित आहे.
"आमच्या निर्बंधांची यंत्रणा, सामायिक संकल्प व्यक्त करण्यासाठी आणि सामायिक हितसंबंधांना पुढे जाण्यासाठी आमच्यात सामील होण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी मी येथे मैत्रीच्या भावनेने आलो आहे. तसंच निर्बंधांना टाळण्याचा किंवा मागे घेण्याचा सक्रियपणे प्रयत्न करणार्या देशांवर नक्कीच काही परिणामांना सामोरं जावं लागेल", असंही दलीप सिंग म्हणाले.