चेन्नई: हल्लीच्या काळात समाजातील इतर घटकांप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नातेही बदलले आहे. पूर्वीच्या काळी गुरू-शिष्यांच्या नात्यात असणारी आपुलकी हल्लीच्या व्यवसायिक वातावरणात कुठेतरी लुप्त झाल्यासारखी दिसते. मात्र, तामिळनाडूतील एका घटनेमुळे अनेकांना शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते किती घट्ट आणि भावनिक असू शकते, हे पाहायला मिळाले. चेन्नईमधील तिरुवल्लरच्या वेलियाग्राम येथील सरकारी शाळेतील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या छायाचित्रांमध्ये काही विद्यार्थी एका शिक्षकाभोवती गराडा करून उभे असल्याचे दिसत आहे. या 28 वर्षीय शिक्षकाचे नाव जी भगवान असे आहे. ते वेलियाग्राम शाळेत सहावी ते दहावी इयत्तेला इंग्रजी विषय शिकवतात. विद्यार्थ्यांमध्ये ते खूपच लोकप्रिय आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची दुसऱ्या शाळेत बदली झाल्याचे पत्र आले. बुधवारी त्यांचा वेलियाग्राम शाळेतील शेवटचा दिवस होता. मात्र, विद्यार्थ्यांनी त्यांना गराडा घालत दुसऱ्या न शाळेत जाण्याची विनंती केली. यावेळी जवळपास सर्वच विद्यार्थी ओक्साबोक्शी रडत होते. विद्यार्थ्यांचे हे प्रेम पाहून जी भगवान यांच्या डोळ्यातूनही अश्रूधारा वाहू लागल्या. हा एकूणच प्रसंग कोणाचेही काळीज हेलावून टाकणारा होता. एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ही छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही छायाचित्रे पाहून शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या मनाला मायेचा पाझर फुटला. शिक्षण विभागाने त्यांच्या बदलीला 10 दिवसांची स्थगिती दिली. ही मुदत संपल्यानंतर आता स्थानिक पालक व शाळा प्रशासनाशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
'आम्हाला सोडून जाऊ नका हो सर'... हुंदके देत-देत मुलांची विनवणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 9:22 PM