नवी दिल्ली: कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच काश्मीरचा दौरा करणार आहे. नरेंद्र मोदी श्रीनगरमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे अनावरण करतील आणि एका जाहीर सभेला संबोधित करतील. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
उद्या श्रीनगरमध्ये होणाऱ्या नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेपूर्वी काश्मीरमधील लोकांना धमकीचे फोन येत आहेत, ज्यामध्ये स्थानिक लोकांना नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेला उपस्थित न राहण्याची धमकी देण्यात येत आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय काश्मीरमधील मोबाईल आणि लँडलाईनवर नरेंद्र मोदींच्या रॅलीवर बहिष्कार घालण्यासाठी कॉल करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
काश्मीरमधील लोकांना वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय फोन नंबरवरून कॉल येत आहेत. फोन उचलत असताना लोकांना धमकावले जात आहे आणि उद्याच्या पंतप्रधानांच्या रॅलीपासून दूर राहण्यास सांगितले जात आहे. याची माहिती मिळताच सुरक्षा दल आणि गुप्तचर यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
५ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन-
पंतप्रधान मोदी श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये जम्मू आणि काश्मीरचा विकास करा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि केंद्रशासित प्रदेशातील कृषी-अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुमारे ५००० कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन करतील. यामध्ये "स्वदेश दर्शन" आणि "प्रसाद" (तीर्थक्षेत्र पुनरुज्जीवन आणि अध्यात्मिक, हेरिटेज प्रमोशन ड्राइव्ह) योजनांच्या अंतर्गत १४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पर्यटन क्षेत्राशी संबंधित देशव्यापी प्रकल्पांचा समावेश आहे, ज्यामध्ये एकात्मिक विकासासाठी प्रकल्प देखील समाविष्ट आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रे सुपूर्द करणार-
चॅलेंज-बेस्ड डेस्टिनेशन डेव्हलपमेंट (CBDD) योजनेंतर्गत निवडलेल्या पर्यटन स्थळांची घोषणा करण्यासोबतच, पंतप्रधान “देखो अपना देश पीपल्स चॉइस टुरिस्ट डेस्टिनेशन पोल” आणि “चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा” मोहिमेचा शुभारंभ करतील. पंतप्रधान मोदी जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे १००० नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करतील आणि महिला, शेतकरी आणि उद्योजकांसह विविध केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधतील.