रायपूर : छत्तीसगडमध्ये सोमवारी एक अजब घटना घडली. मुख्यमंत्री भूपेश बघेल पत्रकार परिषदेत बोलत असताना अचानक त्याठिकाणी साप आला. यावेळी उपस्थितांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, घटनास्थळी असलेल्या लोकांना मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सापाला मारू नका असे आवाहन केले. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मुख्यमंत्री भूपेश बघेल पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलत असताना अचानक त्याठिकाणी साप आला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार आणि लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला. साप पाहून मुख्यमंत्री भूपेश बघेल मागे फिरले. त्यांनी लोकांना सापाला मारू नका असे आवाहन केले. तसेच, हे एक पिरपिटी आहे. काळजी करू नका. त्याला मारू नका, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले.
याचबरोबर, आज नागपंचमी आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. "नागपंचमीच्या शुभ सणानिमित्त राज्यातील सर्व रहिवाशांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. आपल्या सर्वांवर महादेवाची कृपा असावी. सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी यावी", अशा शब्दांत मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
भूपेश बघेल यांचा राजकीय प्रवासमध्यप्रदेशातील (आताच्या छत्तीसगड) दुर्ग येथे २३ ऑगस्ट १९६१ रोजी जन्मलेल्या बघेल यांनी ८०च्या दशकात काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणास प्रारंभ केला. दुर्ग जिल्ह्यातच ते युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९० ते ९४ पर्यंत जिल्हा युवक कमिटी, दुर्ग (ग्रामीण )चे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. १९९३ ते २००१ पर्यंत मध्यप्रदेश हौसिंग बोर्डाचे ते संचालक होते. २०००मध्ये छत्तीसगड राज्याची निर्मिती झाल्यानंतर त्यांनी पाटन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विधानसभेत प्रवेश केला. या काळात ते कॅबिनेट मंत्रीही झाले. २००३ मध्ये काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर ते विरोधी पक्षाचे उपनेते झाले. २०१४ मध्ये त्यांची छत्तीसगड काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ते छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत.