नवी दिल्ली : कोरोना विषाणूचे संकट संपलेले नाही. त्याकडे थोडेसेही दुर्लक्ष झाले तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल व सणासुदींच्या उत्साहावर पाणी पडेल, असा इशारा पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी दिला. लॉकडाउन संपला असला तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे काळजी घ्यावी लागणार असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.
मंगळवारी मोदी यांनी सायंकाळी सहा वाजता देशाला उद्देशून भाषण केले. कोरोना विषाणूची साथ आल्यापासून त्यांचे हे सातवे भाषण होते. मोदी यांच्या भाषणात पाच ठळक गोष्टींवर भर होता.
मोदींच्या भाषणातील ५ महत्वाचे मुद्दे -विनंती - जोखीम घेऊ नका - कोरोना रोखण्यासाठी जी काळजी घ्यायची आहे तीच थांबवली गेल्याचे अनेक व्हिडीओज बघायला मिळत आहेत. तुम्ही मास्क न वापरता इकडेतिकडे फिरणार असाल तर तुम्ही स्वत:सह, तुमची मुले, घरातील ज्येष्ठ अशा अनेकांना जोखीम निर्माण करत आहात.
दक्षता - अन्यथा वाढतील रुग्ण -युरोप, अमेरिका आणि इतर देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या घटल्याचे पाहण्यात आल्यानंतर पुन्हा तेथे रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. आपण सतत दक्ष राहिले पाहिजे व लस येईपर्यंत कठोरपणे नियमांचे पालन केले पाहिजे.
इशारा - किंमत मोजावी लागेल -कोरोना विषाणूचे संकट संपलेले नाही. त्याकडे थोडेसेही दुर्लक्ष झाले तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल व सणासुदींच्या उत्साहावर पाणी पडेल. भलेही लॉकडाऊन आज नाही. परंतु, विषाणू अजूनही आहे याचा विसर आम्ही पडू देऊ नये. कोरोनाकडे दुर्लक्ष करण्याची ही वेळ नाही.
काळजी - प्रत्येकाला लस -लस जेव्हा केव्हा उपलब्ध होईल तेव्हा ती प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचेल यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गेल्या सात-आठ महिन्यांत प्रत्येक भारतीयाने केलेल्या प्रयत्नांमुळे देशात परिस्थिती स्थिर आहे. आपण ती बिघडू द्यायला नको. त्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
विश्वास - टेस्ट हीच ताकद -कोविड रुग्णांसाठी देशात ९० लाख खाटांची व्यवस्था, १२ हजार क्वारंटाईन केंद्रे व दोन हजार विषाणू चाचणी प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. १० कोटींच्या वर चाचण्या झाल्या. कोरोनाच्या विरोधातील लढाईत आमची ताकद ही चाचण्यांची वाढलेली संख्येत आहे.