नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये, असे आवाहन करताना त्यांनी मोदींवर निशाणाही साधल. आता, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मनमोहनसिंग यांच्या पत्राला प्रत्युत्तर देत सिंग यांच्यावरच निशाणा साधला आहे. भारताय सैन्याचा अपमान न करण्याचा आवाहन नड्डा यांनी सिंग यांना केलंय. तसेच, एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकनंतरही काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी असाच सैन्याचा अपमान केला होता, असेही नड्डांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शब्दांची निवड सावधानतेने करावी असा सल्ला सिंग यांनी पत्रातून दिला आहे. मनमोहन सिंगांनी आपल्या पत्रात म्हटले की, 15-16 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत भारताच्या 20 लढवय्या जवानांनी सर्वोच्च बलिदान दिले. या सैनिकांनी साहसाने कर्तव्य पार पाडले. देशाच्या या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा केली. त्यासाठी आम्ही जवानांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे कृतज्ञ आहोत, त्याचे बलिदान व्यर्थ जाता कामा नये.
नड्डा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मनमोहनसिंग यांच्या पत्राला उत्तर देताना, निश्चितच ते काही विषयांसंदर्भात आम्हाला सल्ला व सूचना देऊ शकतात. मात्र, पंतप्रधान कार्यालयाची जबाबदारी त्यापैकी एक नाही. शिवाय ते त्याच पक्षाचे नेते आहेत, ज्या पक्षाने हजारो किमी जमीन चीनला देऊ केल्याचे म्हटले. नड्डा यांनी मनमोहन सिंग यांच्यावर निशाणा साधला. डॉक्टर मनमोहनसिग हे त्याच पक्षाचे आहेत, ज्या पक्षाने 43000 किमी जमी चीनला दिली आहे. कुठल्याही लढाईशिवाय रणनिती आणि क्षेत्रीय समर्पण युपीए सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. डॉ. सिंग हे चीनी डिझाईनमुळे चिंतेत आहेत. सन 2010 ते 2013 या कालावधीत चीनकडून 600 पेक्षा अधिकवेळी सीमाभागात घुसखोरी करण्यात आली, त्यावेळी सिंग हेच अध्यक्ष होते, असेही नड्डा यांनी म्हटलंय.
दरम्यान, आपण आज इतिहासातील एका नाजूक वळणावर उभे आहोत. आपल्या सरकारचे निर्णय आणि सरकारने उचललेली पाऊले भविष्यातील पिढ्यांनी आपले कसे आकलन करावे हे ठरवणार आहेत. जे देशाचे नेतृत्व करत आहेत, त्यांच्या खांद्यावर कर्तव्याचे मोठे दायित्व आहे. आपल्या लोकशाहीमध्ये हे दायित्व पंतप्रधानाचे असते. त्यामुळे पंतप्रधानांनी आपल्या शब्दांद्वारे देशावर होणारे परिणाम, रणनीती, सुरक्षा, भौगोलिक हित आदींच्या परिणामांसाठी खूप सावध रहायला हवे, असा सल्ला सिंग यांनी दिला आहे. चीनने एप्रिल 2020 पासून आजपर्यंत भारतीय सीमेमध्ये गलवान घाटी आणि पेंगाँग शो लेक परिसरात अनेकदा घुसखोरी केली आहे. आम्ही ना ही त्यांच्या धमक्यांना भीक घालणार, ना त्यांच्या दबावापुढे झुकणार आहोत. देशाच्या अखंडतेबाबत कोणताही समझोता करण्यात येणार नाही. पंतप्रधानांनी त्यांच्या वक्तव्यातून चीनच्या षडयंत्राला बळ देऊ नये. तसेच सरकारचे सर्व विभाग या संकटाला एकत्रितपणे कसे सामोरे जातील, हे पहावे, असा सल्ला मनमोहन सिंग यांनी दिला.
एकजूट व्हायची वेळही वेळ चीनविरोधात साऱ्या देशाने एकजूट होण्याची आहे. तरच चीनला चोख प्रत्यूत्तर देता येऊ शकेल. भ्रामक प्रचार कधीही कूटनीती आणि मजबूत नेतृत्वाला पर्याय असू शकत नाही, हे लक्षात ठेवावे. खोटे पसरवून सत्य कधीही लपविले जाऊ शकत नाही, असेही मनमोहन सिंग म्हणाले.